ठाणे : महापौरांच्या स्थगिती आदेशानंतरही चालक भरतीचा निकाल प्रसिद्ध

thane mahanagarpalika

ठाणे : सभागृहामध्ये घेतलेल्या निर्णयांच्या विरोधात जाऊन काम करण्याची प्रवृत्ती प्रशासनामध्ये बळावली आहे. लोकांनी ज्या नगरसेवकांना सभागृहामध्ये पाठवले आहे त्या सभागृहाचे महत्वच प्रशासनाकडून कमी केले जात आहे. ठामपाच्या चालक भरतीला महापौरांनी स्थगिती देऊनही प्रशासनाने संकेतस्थळावर भरतीचा निकाल प्रसिद्ध केला आहे. एकप्रकारे हा ठाणे शहराच्या प्रथम नागरिकांचा अर्थात शहराचाच अवमान आहे. त्यामुळे सर्व नगरसेवकांना बरखास्त करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

ठाणे महापालिकेत घेण्यात आलेल्या चालक भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत ही भरती प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी मागील महिन्यात झालेल्या महासभेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यानुसार या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले होते. परंतु महापौरांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित प्रशासनाने चालकांची यादी प्रसिद्ध केली आहे. प्रशासनाच्या भूमिकेवर मिलींद पाटील यांनी जोरदार टीका केली. या वेळी नगरसेवक शानू पठाण, मुकूंद केणी, सुहास देसाई, प्रकाश बर्डे, आरती गायकवाड, मोरेश्वर किणी, परिवहन सदस्य तकी चेऊलकर आदी उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारामध्ये सभागृहाला विशेष महत्व आहे. मात्र, हे महत्वच बाधीत करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. ज्या निर्णयांना सभागृहामध्ये विरोध केला जात आहे. तेच निर्णय पालिका प्रशासन रेटून पुढे नेत आहे. कोठारी कंपाऊंड येथील हुक्का पार्लरबाबत महापौर आक्रमक झाल्यानंतरही प्रशासनाने केवळ दिखाव्याची कारवाई केली. पोलिसांना देण्यात येणा-या बुलेटला विरोध केल्यानंतरही त्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकंदर हे प्रशासन ठामपाच्या सभागृहाला जुमानेसे झाले आहे. महापौरांचा वारंवार अपमान केला जात आहे. सत्ताधारी पक्षाकडूनही त्याबाबत महापौरांना एकाकी पाडले जात आहे. मात्र, आम्ही महापौरांच्या सोबत आहोत. त्यांनी विशेष निषेध महासभा बोलवावी; आम्ही त्यामध्ये आमच्या भावना मोकळ्या करु. तसेच, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जर आमच्या आणि सभागृहाच्या निर्णयांना महत्व दिले जात नसेल तर आम्हाला बरखास्त करा, अशी मागणी करणार आहोत, असे सांगितले.