सेनेचे “ठाणे” दार केरळात..! पालकमंत्र्यांसह डॉ.श्रीकांत शिंदे यांची टीम देखील रवाना..!

मुंबई/प्राजक्त झावरे-पाटील – केरळ राज्यावर आलेल्या महापुराच्या अस्मानी संकटाने केरळचे कंबरडे मोडले आहे. पाण्याने संपूर्ण राज्यच गिळंकृत केल्यासारखी परिस्थिती केरळात आहे. यातून राज्याला बाहेर काढण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याच आवाहन केरळातून होत असताना त्याला वेगवेगळ्या पक्ष, संस्था, सेलेब्रिटी आदींनी भरघोस मदत केली आहे. या केरळमधील पूरग्रस्तांसाठी ठाणे शिवसेनेने देखील आपला हात पुढे केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या चित्र प्रदर्शनासोबत सर्व आमदार-खासदार, मुंबई-ठाणे नगरसेवक आपले मानधन केरळसाठी देणार असल्याचे जाहीर केले. या सोबतच ठाणे जिल्हा शाखेने नेहमीप्रमाणे समाजासाठी काहीही ही आपली दिघे साहेबांपासून सुरू असलेली परंपरा पालकमंत्री शिंदे साहेबांनी आजपर्यंत सुरू ठेवली आहे. ठाणे जिल्हा सेनेची टीम महाराष्ट्रात आदर्शवत टीम असल्याचे सगळेच जाहीर कबूल करतात. त्याच स्वभावाला अनुसरून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार बालाजी किणीकर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह ५० डॉक्टरांचे पथक कपडे, चादरी, साबण, तांदूळ, डाळ, साखर, बिस्कीट पुडे आदी वस्तूंचा समावेश असलेले सुमारे ५० टन सामान घेऊन केरळच्या दिशेने सायंकाळी रवाना झाले

फक्त मतदनिधी देऊन न थांबता प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पुराचा जोर ओसरल्यानंतर आता साथीचे आजार पसरण्याची भीती असल्यामुळे वैद्यकीय मदतीची मोठी आवश्यकता आहे. यावर मात करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत यांच्यासह ५० डॉक्टरांची टीम डॉ. दिनकर देसाई, डॉ. जे.बी. भोर यांच्या नेतृत्वाखाली रवाना झाली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन आणि वागळे इस्टेट डॉक्टर्स असोसिएशन यांच्यासह डॉक्टरांच्या विविध संघटनांचे सदस्य या पथकात सहभागी होत आहेत. केरळमध्ये विविध ठिकाणी वैद्यकीय मदतकेंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. सुमारे १० हजार नागरिकांना याचा लाभ होईल, अशी आशा यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. तसेच यापाठोपाठ जशी गरज भासेल, तशी टप्प्याटप्प्याने मदत दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सामाजिक बांधिलकी जपणारी ठाणे जिल्हा शाखा, त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सहयोगी शाखा यांनी मागच्या दुष्काळात देखील ठाण्यात जवळपास महिनाभर दुष्काळग्रस्त लोकांना आसरा देऊन सोय केली होती. बाकी सगळ्याच आपत्तीत नेहमीच सर्वात पुढे सेनेची शाखाच असते , असे नागरिक देखील कबूल करतात. केरळमध्ये सेनेचे ताकद अगदी नगण्य आहे, परंतु सामाजिक भान जिवंत ठेवून पालकमंत्र्यांसह खासदार-आमदार यांनी केलेली ही कामगिरी नक्कीच अभिमानास्पद आहे, हे तितकेच खरे.!

 

Comments
Loading...