fbpx

ऐतिहासिक ‘ठाकरे’ चित्रपट पहाटे प्रदर्शित , प्रेक्षकांची तोबा गर्दी

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनातील प्रवासावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमाचा पहिला शो मुंबईतील वडाळा येथील आयमॅक्स थिएटरमध्ये पहाटे 4.15 वाजता सुरु झाला. मुंबईत कडाक्याची थंडी सुरु असतानाही, पहाटे पहाटे आयमॅक्समध्ये प्रचंड गर्दी झाली. मनसे नेते अभिजीत पानसे यांचं दिग्दर्शन आणि अभिनेते नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी साकारलेली बाळासाहेबांची व्यक्तिरेखा पाहण्याची उत्सुकता अवघ्या मराठी जनांना आहे. त्यामुळे पहाटे चार वाजताचा शो हाऊसफुल्ल होणार, हे ओघाने आलेच. या सिनेमाच्या निर्मितीची धुरा शिवसेनेचे खासदार आणि बाळासाहेबांचे निटवर्तीय राहिलेले संजय राऊत यांनी सांभाळली आहेत. अभिनेत्री अमृता राव हिने माँसाहेबांची अर्थात बाळासाहेबांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

साधारणपणे कुठल्याही सिनेमाचा पहिला शो सकाळी सात वाजता प्रदर्शित केला जातो. पण एखाद्या सिनेमाला पहाटे 4.15 ला प्रदर्शित करणे हे पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे आयमॅक्समध्ये 4.15 ला ठाकरेचा शो सुरु झाल्याने, हे सुद्धा एक ऐतिहासिक आहे. आयमॅक्समध्ये ठाकरे सिनेमाच्या पहिल्या शोसाठी ढोल-ताशा वाजवण्यात आला. दिग्दर्शक अभिजीत पानसे सुद्धा या शोला उपस्थित होते. आपण सिनेमासाठी घेतलेल्या मेहनतीला फळ आता मिळेल. तसेच, सिनेमाच्या पहिल्या शोला बाळासाहेबांची छबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवधर यांनी देखील हजेरी लावली आहे. देशभरात 1200 ते 1300 स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे. विदेशातही 400 ते 500 स्क्रीनवर हा सिनेमा प्रदर्शित होईल.