ठाकरेंची लोकप्रियता ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची; जावेद अख्तर यांनी केलं कौतुक

javed akhtar vs uddhaav thackeray

मुंबई : शिवसेनेनं २०१९ च्या विधानसभा निकालानंतर भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार हे मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे हे विराजमान होतील या अटीवर उदयास आल्यानंतर भाजपने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, देशातील विविध सर्व्हेंमध्ये मुख्यमंत्री ठाकरे हे सर्वोत्तम व लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या पाचात असल्याचे समोर आले होते.

यावरून देखील भाजपने त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. आता प्रसिद्ध गीतकार, कवी जावेद अख्तर यांनी देखील त्यांचे कौतूक केले आहे. अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांची तुलना तालिबान्यांशी केल्यामुळे मोठा वाद सुरु झाला होता. याबाबत त्यांनी एक लेख लिहून स्पष्टीकरण केलं असून यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

जावेद अख्तर यांनी सामनामध्ये लेख लिहून या प्रकरणी स्पष्टीकरण देत सविस्तर भाष्य केले आहे. जेव्हा ‘एनडीटीव्ही’ वाहिनीला मुलाखत दिली तेव्हा अजिबात कल्पना नव्हती की, या मुलाखतीचे इतके तीव्र पडसाद उमटतील. एका बाजूला असे काही लोक आहेत ज्यांनी शक्य तितक्या तीव्र भाषेत त्यांचा निषेध आणि संताप व्यक्त केला आहे, तर दुसरीकडे देशाच्या कानाकोपऱ्यातील असे अनेक लोक आहेत ज्यांनी मला समर्थनाचे संदेश पाठवले आहेत आणि माझ्या मताशी त्यांची सहमती व्यक्त केली आहे. मी त्या सर्वांचे नक्कीच आभार मानीन, पण प्रत्येक टीकाकाराला वैयक्तिकरीत्या उत्तर देणे शक्य नसल्यामुळे हे माझे जाहीर उत्तर आहे, असे जावेद अख्तर यांनी स्पष्ट केले आहे.

यासोबतच, ‘एकीकडे हिंदू उजव्या विचारसरणीचे समर्थक माझ्यावर चिडलेले असताना एका प्रमुख राजकीय नेत्याने आपल्या महाविकास आघाडी सरकारला तालिबाने म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत उत्कृष्ट नेतृत्वाखाली ज्या तीन पक्षांच्या आघाडीचे महाराष्ट्रात सध्या सरकार स्थापन आहे, त्यांच्यापैकी कोणत्याही पक्षाचा मी सदस्य नाही. महाराष्ट्रातील त्यांची लोकप्रियता पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूतील स्टॅलिन यांच्या तोडीची आहे. त्यांचे सर्वात कठोर टीकाकारही त्यांच्यावर कोणताही भेदभाव किंवा अन्याय करत असल्याचा आरोप करु शकत नाहीत. असे असताना कोणीही उद्धव ठाकरे यांच्या सरकारला तालिबाने कसे व का म्हणू शकले हे मला तरी उमगलेले नाही,’ असं देखील अख्तर यांनी या लेखात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या