‘तिसऱ्या लाटेची वाट न पाहता आपण स्वंयपूर्ण झालंच पाहिजे, अशी ठाकरे-पवारांची इच्छा’

जालना : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने थैमान घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील स्थिती गंभीर झाली आहे. रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून आरोग्य व्यवस्थेवर देखील मोठा ताण निर्माण झाला आहे. या लाटेतील कोरोना स्ट्रेन हा अधिक धोकादायक असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे.

यासोबतच, विषाणू आताप्रमाणेच पुढे पसरत राहिला आणि नव्या स्ट्रेनने रोगप्रतिकारक शक्तीला चकमा देणारी कार्यपद्धती विकसित केल्यास देशात लवकरच तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने देखील तिसऱ्या लाटेला सक्षमपणे सामोरं जाण्यासाठी आतापासूनच तयारी सुरु केली आहे.

आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधून राज्यातील कोरोना स्थितीवर सविस्तर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी ऑक्सिजन साठ्याच्या पुरवठ्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिसऱ्या लाटेची वाट न पाहता आपण स्वंयपूर्ण झालंच पाहिजे, असा आदेश दिल्याचे टोपेंनी सांगितलं आहे.

टोपे म्हणाले, ‘ऑक्सिजनचा महत्त्वाचा विषय आहे. राज्यात ठिकठिकाणी ऑक्सिजन नर्स नेमण्याचं आपण ठरवलं आहे. तसेच ऑक्सिजन ऑडिटच्या माध्यमातून ऑक्सिजनचे लिकेज थांबवणे, प्लांटची तपासणी करण्याचं ठरवलं आहे. ऑक्सिजन जनरेटरच्या संदर्भात आपण 150 पेक्षा जास्त प्लांटची ऑर्डर दिली आहे. तिसऱ्या लाटेची वाट न पाहता आपण स्वंयपूर्ण झालंच पाहिजे अशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यंमंत्र्यांची इच्छा आहे,’ असं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या