तर ठाकरे सिनेमा प्रदर्शित होवू देणार नाही : संभाजी ब्रिगेड

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमासाठी इतर चित्रपटांनी आपली प्रदर्शन तारीख पुढे ढकलली आहे. मात्र आता ठाकरे सिनेमालाच प्रदर्शित होवू देणार नसल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आला आहे. ठाकरे सिनेमामधील काही द्रूश्यावर संभाजी ब्रिगेडकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

सिनेमामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणाऱ्या नवाजुद्दिन सिद्दिकी एका सीनमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पायात पादत्राणं घालून पुष्पहार अर्पण करताना दिसत आहे. याच द्रूश्यावर संभाजी ब्रिगेडकडून आक्षेप नोंदवण्यात येत आहे. छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत. त्यामुळे सिनेमातील हे दृश्य छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारा आहे. सिनेमातील हे दृश्य निर्माता आणि दिग्दर्शक यांनी तात्काळ वगळावे अन्यथा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक कपिल ढोके यांनी दिला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असणारा ठाकरे सिनेमा २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये बॉलीवूड कलाकार नवाजुद्दिन सिद्दिकीने मुख्य भूमिका साकारलेली आहे. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांचे कर्तृत्व मोठे असून त्यांच्या सिनेमाला विरोध असण्याचं काही कारण नाही. परंतु चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. हे खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आला आहे.