‘आपलं खोटं बाहेर पडेल या भीतीने ठाकरे सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतंय’

chandrakant patil

नागपूर : ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाचे आरक्षण गेल्याची टीका भाजप नेते करत आहेत. येत्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला मोठा धक्का बसणार असून याला आघाडी सरकारच जबाबदार आहे, असा हल्लाबोल करत आज भाजपने १ हजार ठिकाणी आक्रमक निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे.

तर दुसरीकडे केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी न दिल्याने व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्याने फक्त महाराष्ट्राच नाही तर देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. आंदोलनाची नौटंकी करून त्यांना आपले पाप झाकता येणार नाही. हिम्मत असेल तर त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन करावे असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.

दरम्यान यावरून भाजप विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पहावयास मिळत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपा महाराष्ट्र वेळोवेळी ओबीसी समाजाच्या मागे खंबीरपणे उभी राहिली आहे. भाजपाने ओबीसींसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली आणि आजही संघर्ष करत आहे. परंतु आपलं खोटं बाहेर पडेल या भीतीने भाजपाचे आजचे ओबीसी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार करत आहे. असा आरोप केला आहे. शेवटी सत्य कितीही झाकले तरी ते बाहेर पडणारच! महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला हे संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला कळून चुकले आहे. ‘जनता भोळी जरूर आहे, पण मूर्ख नाही’हे मविआ सरकारने योग्यरीत्या लक्षात ठेवावे. असा इशाराही चंद्रकांत पाटलांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या