‘ठाकरी’ शैलीत ठाकरे बंधूंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

टीम महाराष्ट्र देशा- नववर्षाच्या सुरूवातीलाच ठाकरे बंधूनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्यास सुरूवात केली. पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या मुलाखतीवर राज यांनी आपल्या खास शैलीतून खरपूस समाचार घेतला. पंतप्रधान मोदी यांच्या मुलाखतीचे वादळ हे चहाच्या पेल्यातलेच ठरले, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनातील अग्रलेखामधून लगावला आहे.

राज ठाकरेंचे फटकारे

एक मनमोकळी मुलाखत! या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी हे स्वत:च स्वत:ची मुलाखत घेत आहेत. तसेच बोला काय विचारू? अशी विचारणा करत आहेत, असे दर्शवले आहे. आजूबाजूला मोदींचे परदेश दौरे, सरदार पटेल यांचा पुतळा, चीनमधील ड्रमवादन असे मोदीमय वातावरण चित्रित केले आहे. त्यातून मोदींचा मीपणा दर्शवला आहे.

उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

राम मंदिराच्या मागणीसाठी शेकडो कारसेवक मारले गेले, हिंदूंचा नरसंहार झाला. दंगली झाल्या. न्यायालयांच्या प्रक्रियेतून राममंदिराचा निर्णय घ्यायचा होता मग हा रक्तपात आणि नरसंहार घडवला कशासाठी? अशी विचारणाही उद्धव ठाकरे यांनी केली.तसेच नोटाबंदी, पाकिस्तान, परदेशातील काळा पैसा या प्रश्नांवर मोदींनी दिलेल्या उत्तरांवरही सामनातील अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.