टेस्लाने त्वरित भारतात उत्पादन सुरु करावं अन्यथा… : नितीन गडकरी

नवी दिल्ली : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. आता सरकारनेही इलेक्ट्रिक कारच्या विक्रीला चालना देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा अधिक विचार करत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराने हवेचे प्रदूषण टळणार आहे. भारत कच्चे तेल आणि नैसर्गिक वायुच्या गरजेसाठी ८० टक्के आयात करतो. त्यासाठी लागणाऱ्या विदेशी चलनाचे प्रमाण हे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराने कमी होऊ शकते.

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अमेरिकन इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्ला कडे विनंती केली आहे की, कंपनीने लवकरात लवकर भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू करावे. सरकार ईव्ही उत्पादक कंपनीला देशात औद्योगिक क्लस्टर तयार करण्यास मदत करेल, अशी ग्वाही गडकरी यांनी टेस्लाला दिली आहे. नितीन गडकरी रायसीना डायलॉग 2021 मध्ये बोलत होते, तेथे त्यांनी इलेक्ट्रिक मोबिलिटी, ईव्ही बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग, व्हेईकल स्क्रॅप पॉलिसीसारख्या अनेक विषयांवर भाष्य केले, तसेच विविध प्रश्नांची उत्तरं दिली.

‘टेस्ला मॅनेजमेंटबरोबर माझी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक झाली. या बैठकीवेळी मी त्यांना सुचवलं की त्यांच्यासाठी भारतात उत्पादन सुरू करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे कारण, सध्या ऑटो एलिमेंट्सचा प्रश्न आहे, टेस्ला आधीपासूनच भारतीय उत्पादकांकडून विविध एलिमेंट्स (घटक) घेत आहे. तसेच यावेळी गडकरी यांनी टेस्लाच्या अधिकाऱ्यांना आश्वासन दिले की, कंपनी स्वतः भारतात त्यांचे वेंडर्स (विक्रेते) तयार करु शकते, तसेच कंपनी येथे तयार केलेल्या वाहनांची अन्य देशांमध्ये निर्यात करु शकते.’ असे मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

तसेच ‘टेस्लाने लवकरच भारतात काम सुरू केले पाहिजे, अन्यथा भारतात कार्यरत इतर ईव्ही उत्पादक कंपन्या लवकरच टेस्लाच्या स्टँडर्डच्या गाड्यांची निर्मिती सुरु करतील. गडकरी म्हणाले की, दिवसेंदिवस भारतीय उत्पादनातही सुधारणा होत आहे आणि दोन वर्षांत आम्हाला टेस्ला स्टँडर्ड इलेक्ट्रिक वाहने भारतीय बाजारात मिळतील. म्हणूनच, टेस्लाच्या हितासाठी मी सुचवतो की, त्यांनी शक्य तितक्या लवकर वाहनांचे उत्पादन सुरू करावे. ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल.’ असा सल्ला देखील यावेळी नितीन गडकरी यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या