कश्मीरात पोलीस वसाहतीवर आत्मघाती हल्ला

BSF-JAWAN,indian army

पुलवामा/ वेब टीम; पुलवामा येथील पोलीस वसाहतीवर आज पहाटे जैश ए मोहम्मदच्या तीन अतिरेक्यांनी भयंकर आत्मघाती हल्ला चढवला. पोलिसांच्या कुटुंबांना ओलीस ठेवण्याच्या इराद्यानेच अतिरेकी वसाहतीत घुसले. पण पोलीस व सीआरपीएफच्या जवानांनी अत्यंत चतुराईने 36 कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र ही कामगिरी फत्ते करत असताना आठ जवान शहीद झाले.

थेट पोलिसांच्या क्वॉर्टरलाच लक्ष्य केल्यानं हा मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात आठ जवान शहीद झाले असून त्यात सीआरपीएफचे जवान रवींद्र धनवडे आणि जसवंतसिंग तसेच पोलीस कॉन्स्टेबल इम्तियाज अहमद शेख यांचा समावेश आहे. रवींद्र धनवडे हे महाराष्ट्राच्या सातारा जिल्हय़ातील मोहोट येथील रहिवासी आहेत. शहीद जवानांत चार सीआरपीएफचे असून एक स्थानिक पोलीस तर तीन जवान स्पेशल पोलीस फोर्सचे असल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यात मोहंमद याकूब जोरा, पम्मीकुमार, कर्मी प्रभू नारायण, एस.बी. सुधाकर हे जखमी झाले.

दहशतवाद्यांना संरक्षण देण्यासाठी फुटीरतावाद्यांची दगडफेक 

पोलीस वसाहतीमध्ये एन्काऊंटर सुरू असल्याचे कळताच फुटीरवादी मोठय़ा प्रमाणावर रस्त्यावर उतरले. अतिरेक्यांना संरक्षण देण्यासाठी या फुटीरवाद्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. या जमावाला हुसकावून लावण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.

दरम्यान दहशतवादी हल्ल्यानंतर पोलीस क्वॉर्टर रिकामी करण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. या परिसरात जवळपास 10 इमारती आहेत, त्यापैकी दोन ब्लॉक खाली करण्यात आले आहेत. दहशतवादी सध्या या रहिवाशी इमारतींपैकी एका इमारतीमध्ये लपले असून त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा असल्याची प्राथमिक माहिती आहे. अजूनही तीन दहशतवादी या इमारतींमध्ये लपले आहेत.