fbpx

पुलवामामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; 12 जवान शहीद

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) एका तुकडीवर दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात १२ जवान शहीद झाले असल्याचं टाइम्स नाऊचं वृत्त आहे. या भ्याड हल्ल्यात 40 जण जखमी झाले असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.

सीआरपीएफच्या माहितीनुसार, रस्त्यावर एका चारचाकी गाडीमध्ये IED बॉम्ब ठेवण्यात आला होता. कार महामार्गावर उभी होती. सुरक्षा जवानांच्या गाडीचा ताफा त्या कारजवळ आल्यानंतर लागलीच या कारमधली बॉम्बचा स्फोट झाला. त्यानंतर सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांकडून गोळीबारही करण्यात आला.

जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यानंतर तत्काळ पुलवामात असलेलं सैन्य, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या अन्य तुकड्यांना अवंतीपोरा येथे पाठवण्यात आलं आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तूर्त बंद करण्यात आली आहे. आसपासच्या भागात मोठं सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. याशिवाय पुलवामा, शोपियाँ, कुलगाम आणि श्रीनगर जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.