जिओ फोन घेताय? मग या नियम व अटी नक्की वाचा.

मोबाईल विश्वात मोफत फोनची ऑफर देऊन रिलायन्स जीओने ग्राहकांना खुश केले. १५०० रुपये अनामत रक्कम ठेवून खरेदी केलेल्या या फोनची ग्राहकांनाही मोठी उत्सुकता आहे. नव्या फोनमध्ये अनलिमिटेडे डेटा दिला जाणार आहे. मात्र हा फोन घेताना तुम्ही जिओ फोनच्या या अटी वाचल्या आहेत का?रिलायन्स जिओच्या बहुप्रतिक्षीत फोनची शिपिंग सुरु झाली आहे. मात्र त्यापूर्वी या फोनविषयीच्या काही अटी समोर आल्या आहेत. त्याबद्दल जाणून घेऊयात…

१) अनामत रक्कम म्हणून भरलेले 1500 रुपये तीन वर्षात फोन परत करुन ग्राहकांना मिळणार आहेत. मात्र या तीन वर्षांच्या काळात ग्राहकांना दरवर्षी 1500 याप्रमाणे 4500 रुपये रिचार्जसाठी खर्च करावे लागतील.

२) तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर 90 दिवसांच्या आत फोन परत न केल्यास अनामत रक्कम जप्त केली जाईल. म्हणजेच ग्राहकांना एक रुपयाही मिळणार नाही.

३) जिओ फोनमध्ये एकच इनबिल्ट सिम असेल, जे लॉक केलेले असेल. त्यामुळे तुम्हाला दुसरे सिम यामध्ये वापरता येणार नाही.

४) एका वर्षातच हा फोन परत केल्यास ग्राहकांना पैसे परत मिळणार नाहीत. याउलट 1500 रुपये आणि जीएसटी भरावा लागेल. ग्राहकांनी 12-14 महिने म्हणजे एका वर्षानंतर फोन परत केला तर त्यांना जिओकडून 500 रुपये परत मिळतील. 24-36 महिन्यांमध्ये हा फोन परत केल्यास 1000 रुपये मिळतील. 36 महिन्यांनंतर म्हणजे तीन वर्षांनंतर फोन परत केला तर 1500 रुपये परत मिळतील.

५) फोनसाठी आपण 1500 रुपये भरले असले तरी तुम्ही तुमच्या फोनचे मालक नसाल. कारण हा फोन तुम्हाला परत करायचा आहे. हा फोन विकण्याचे किंवा दुसऱ्य़ा व्यक्तीला वापरण्यासाठी देण्याचे अधिकार तुमच्याकडे नसतील. कंपनी आणि सरकारने जाहीर केलेल्या नियमांनुसारच या फोनचा वापर करता येईल.

६) या फोनमध्ये ग्राहकांना कोणतीही छेडछाड करता येणार नाही. सॉफ्टवेअर बदलणं, सिम अनलॉक करणं, हे बेकायदेशीर असेल. कंपनी भविष्यात दुसऱ्या नेटवर्कसाठी सपोर्टची अपडेट देऊ शकते.

७) जिओ फोन वापरत असाल तर कंपनीला तुम्ही कुठे आहात हे नेहमी माहित असेल. कारण लोकेशन संबंधित नोटिफिकेशन आणि माहिती देण्यासाठी तुम्हाला लोकेशन सेटिंग नेहमी चालू ठेवावी लागणार आहे.