दहावी-बारावी पुरवणी परीक्षा; अर्ज प्रक्रियेस सुरुवात!

दहावी-बारावी पुरवणी परीक्षा; अर्ज प्रक्रियेस सुरुवात!

औरंगाबाद : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ११ ऑगस्ट पासून विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. या परीक्षेस श्रेणी सुधार योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनावर निकाल जाहीर न करता पुरवणी परीक्षा लेखी स्वरूपात होईल असे संकेत मंडळाने दिले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीची परीक्षा यंदा रद्द करण्यात आली होती. अंतर्गत मूल्यमापनावर आधारित निकाल जाहीर करण्यात आला. निकालाला जुलै-ऑगस्ट उजडल्याने पुरवणी परीक्षा होणार की नाही. असा प्रश्न उपस्थित होत होता. सोमवारी मंडळाने पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये ११ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. विलंब शुल्कासह १९ ते २१ ऑगस्ट पर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

दहावी-बारावीचे परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, तसेच श्रेणी सुधार योजने अंतर्गत व विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले असे वाटत असेल तर विद्यार्थी श्रेणी सुधार योजनेचा फायदा घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दोन संधी असतात. मार्च २०२० मधील विद्यार्थ्यांना श्रेणीसुधारची दुसरी संधी असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या