रॉजर फेडर ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत चौथी फेरीत

blank

लौकिकाला साजेसा शैलीदार खेळ आणि १७ ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदे नावावर असलेल्या रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत चौथी फेरी गाठली. अव्वल दहा मानांकन लाभलेले टेनिसपटू एकेक गुणासाठी संघर्ष करत असताना फेडररने टॉमस बर्डीचवर सरळ सेट्समध्ये सहज विजय मिळवत वेगळेपण सिद्ध केले. अन्य लढतींमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल आणि अव्वल मानांकित अ‍ॅण्डी मरे, स्टॅनिसलॉस वॉवरिन्का, डॅनिएल इव्हान्स, केई निशिकोरी यांनीही चौथ्या फेरीत प्रवेश केला. महिलांमध्ये अव्वल मानांकित अँजेलिक कर्बर, व्हीनस विल्यम्स, गार्बिन म्युगुरुझा यांनी चौथ्या फेरीत आगेकूच केली.

दुखापतीमुळे गेल्या वर्षी प्रदीर्घ काळ खेळू न शकलेल्या फेडररला १७वे मानांकन देण्यात आले आहे. दुसरीकडे प्रतिस्पर्धी बर्डीचला दहावे मानांकन मिळाले होते. या दोघांच्या लढतींच्या इतिहासात फेडरर आघाडीवर होता. पस्तीशीच्या फेडररने जेमतेम दीड तासांत ३१ वर्षीय बर्डीचवर ६-२, ६-४, ६-४ असा विजय मिळवला. कोर्टवर सर्वागीण वावरासह खणखणीत सव्‍‌र्हिस, बहारदार परतीचे फटके, नेटजवळचा सुरेख या गुणवैशिष्टय़ांच्या बळावर फेडररने सहज विजयाची नोंद केली. पुढच्या फेरीत फेडररची लढत जपानच्या केई निशिकोरीशी होणार आहे.