औरंगाबादेत नवीन बसपोर्टचे टेंडर रद्द, कंत्राटदारानेच घेतली माघार; आता पुन्हा टेंडर, पुन्हा गोंधळ…!

औरंगाबादेत नवीन बसपोर्टचे टेंडर रद्द, कंत्राटदारानेच घेतली माघार; आता पुन्हा टेंडर, पुन्हा गोंधळ…!

औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या बहुप्रतिक्षित बसपोर्टचे काम आता अनिश्चित कालावधीसाठी रखडले आहे. बस पोर्ट कामाचे टेंडरच रद्द झाल्यात जमा आहे. मनपाकडून आकारण्यात येणारे सुमारे दीड कोटी रुपयांचे विकास शुल्क माफ करण्यात आले. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकाच्या कामाला आता तरी गती मिळेल असे बोलले जात होते. मात्र या कामाचे टेंडर घेतलेल्या कंत्राटदाराने एसटी महामंडळाकडे आपले पैसे परत मिळावे यासाठी अर्ज केला असून, महामंडळाने देखील कंत्राटदाराला आपली रक्कम परत देण्यात यावी अशा सूचना केल्याची माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली.

शहरातील सीबीएस बस ठाण्याच्या जागी नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तत्कालीन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते बसस्थानकाच्या कामाचे भूमिपूजन देखील करण्यात आले. मात्र अडीच वर्षांनंतरही बसस्थानकाचे काम अजूनही सुरू झालेले नाही. महापालिकेने १ कोटी ५७ लाखांचे विकास शुल्क भरण्याचे पत्र महामंडळाला दिले होते. पोलिस विभागाला जशी शुल्क माफी करण्यात आली तशी आपल्यालाही करण्यात यावे अशी मागणी महामंडळाने केली होती. नुकतीच मनपाने ही शुल्क माफी केली आहे.

बसपोर्टचे काम करणाऱ्या कंत्राटदारानेच आता होत असलेल्या विलंबाला कंटाळून माघार घेतली आहे. हायटेक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला हे काम देण्यात आले होते. कंपनीने १ कोटी ९४ लाखांची रक्कम भरली देखील होती. मात्र गत दोन वर्षांपासून बांधकाम परवान्याच्या अभावी काम सुरू होण्याचे नाव घेत नव्हते. हे काम परवडत नसल्याचे सांगत कंत्राटदाराने आपली रक्कम परत देण्याची मागणी महामंडळाकडे केली होती. त्यानुसार महामंडळाने औरंगाबाद विभाग कार्यालयाला पत्र पाठवून सदर कंत्राटदाराची रक्कम परत देण्याची सूचना केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या