अर्थसंकल्पातून टेन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल – मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा : विकसित देशांच्या पंक्तीकडे मार्गक्रमित युवा भारताला आणखी सशक्त करण्याच्या दृष्टीने अंतरिम अर्थसंकल्प ऐतिहासिक आहे. यामुळे भारताचे टेन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट निश्चितच साध्य होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

बॉम्बे स्टॅाक एक्स्चेंजच्या वतीने आयोजित पोस्ट बजेट इंटरॲक्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल, केंद्रीय बँकिंग व वित्त विभागाचे सचिव राजीव कुमार, सीआयआयचे सरचिटणीस चंद्रजीत बॅनर्जी, बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, वित्तीय क्षेत्राच्या दृष्टीने सुधारणांची ठोस पावले उचलण्यात आल्याने, भारताच्या विकास दरात लक्षणीय अशी वाढ पाहता आली. यामुळे भारताकडे वेगाने विकसित होणारी अर्थसत्ता म्हणून जग पाहू लागले आहे. गरीबी निर्मूलनाच्या दृष्टीकोनातील बदल म्हणूनही आपण या या अर्थसंकल्पाकडे पाहू शकतो. अन्न सुरक्षा, शिक्षण सुरक्षा अशा विविध वित्तीय तरतुदी करण्याच्या पलीकडे जाऊन गुंतवणूक आधारित भूमिका घेतल्याने विविध घटकांना सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्याबाबत विचार केला गेला आहे. आगामी काही दशकात भारत हा सर्वाधिक युवा लोकसंख्या असणारा देश असेल. या वैशिष्ट्याचा पुरेपूर विनियोग करता यावा या पद्धतीने या अर्थसंकल्पाची मांडणी आहे. यातूनच भारताचे टेन ट्रिलियन उद्दिष्ट साध्य करणाऱ्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या क्षेत्रांचा विचार केला गेला आहे.

फडणवीस म्हणाले, कृषि क्षेत्रासाठीच्या मदत व पुनर्वसन या पारंपरिक दृष्टिकोनाऐवजी या क्षेत्राच्या शाश्वत विकासाचे धोरण निश्चित केले आहे. या अंतर्गत सिंचनासाठीची गुंतवणूक, शेतमाल खरेदीबाबतचा अभूतपूर्व निर्णय घेण्यात आले. नागरी व ग्रामीण क्षेत्रातील गृहनिर्माण तसेच स्वच्छ भारत अभियानामुळेही रोजगार निर्मिती झाली. या सर्वांमुळे अर्थव्यवस्थेलाही गती मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
गत काही वर्षात महाराष्ट्राने शेतमाल खरेदी, शौचालय निर्मिती, गृहनिर्माण यात अभूतपूर्व असे उद्दिष्ट साध्य केल्याचेही, श्री. फडणवीस यांनी नमूद केले.

केंद्रीय अर्थमंत्री श्री. गोयल म्हणाले, अर्थसंकल्पात शेतकरी, असंघटित क्षेत्रातील घटकांचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. या घटकांपर्यत आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी रस्ते या पायाभूत सुविधा पोहोचाव्यात, असे प्रयत्न आहेत. गाव हा घटक केंद्रिभूत ठेवून, ग्रामविकासाच्या संकल्पनाबरोबच तेथपर्यंत डिजिटल टेक्नॉलॉजीच्या आधुनिक सुविधा पोहोचाव्यात असे धोरण आहे. त्यासाठी कर्तव्य, निष्ठा आणि समर्पणाच्या भावनेतून केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.

केंद्रीय सचिव श्री राजीव कुमार यांनी गत काही वर्षातील उपाययोजनांमुळे देशातील वित्तीय संरचना बळकट झाल्याबाबत मांडणी केली.