रेणा प्रकल्पात दहा टक्केच पाणीसाठा, पाणी टंचाईची शक्यता

लातूर: तालुक्यात लवकरच पाणी टंचाईची झळा बसणार आहे. तालुक्यातील निम्या गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्प क्षेत्रात यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे प्रकल्पात केवळ ३० टक्के पाणी साठा जमा झाला होता. सध्या प्रकल्पात केवळ १० टक्के पाणीसाठा उपलब्ध असून कांही दिवसात पाण्याचे दुर्भिक्ष व टंचाई जाणवणार आहे. अत्यल्प पाणी साठा असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही सध्याच्या परिस्थितीत गरज बनली आहे.

रेणापुर तालुक्यातील जनतेसह, शेतकऱ्यासाठी वरदान ठरलेल्या भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पातून रेणापूर शहरासह नऊ खेडी, पानगाव व इतर बाराखेडी, बिटरगाव सह पाच खेडी योजना, खरोळा आदी सह निम्या तालुक्याला व अंबाजोगाई तालुक्यातील कांही गावाना येथूनच पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान या वर्षी रेणापुर तालुक्यात जूनमध्ये म्हणजे मृग नक्षत्रात पाऊसास प्रारंभ झाला. पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या. तालुक्यात पिकांसाठी पोषक पाऊस पडत गेल्याने पिके चांगली बहरली.

मात्र परतीचा पाऊस प्रकल्प क्षेत्रात झाला नसल्याने लघु तसेच रेणा मध्यम प्रकल्पात म्हणावा तसा पाणीसाठा जमा झाला नाही. केवळ या प्रकल्पात ३० टक्के पाणी साठा झाला. सध्याच्या परस्थितीत सदर प्रकल्पात केवळ १० टक्के एवढाच उपयुक्त पाणी साठा आहे. वरील पाणी पुरवठा योजनेसाठी एवढा पाणीसाठा अपुरा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकल्पात झालेला अत्यल्प पाणीसाठा व पाणीपुरवठा योजनांसाठी होणारा पाणी उपसा या दोन्ही बाबी लक्षात घेता प्रकल्पावर अवलंबुन असलेल्या गावांना किती दिवस पाणी पुरेल हे सांगता येत नाही.

महत्त्वाच्या बातम्या :