औरंगाबाद शहरात दहा दिवसांचे लॉकडाऊन? जाणून घ्या काय सत्य आहे

lockdown

औरंगाबाद : शहरात सध्या कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या अनुषंगाने शहरात सोमवारपासून दहा दिवसांचे लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. परंतु, शहरात लॉकडाऊन लागणार या विषयी प्रशासनाने अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेतला नसल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी सांगितले आहे. मात्र,शहर लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसत आहे.

कोरोनाचे सावट शहरात वाढत आहे. रुग्ण संख्या दररोज तीनशे पार जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नाकी नऊ आले आहे. काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी रुग्ण संख्या वाढत राहिल्यास, लॉकडाऊन लावण्यासंदर्भात भाष्य केले होते. त्या अनुषंगाने वृत्तवाहिन्यांनी आज शनिवारी लॉकडाऊन संदर्भात बातमी प्रकाशित केल्यामुळे शहरात लॉकडाऊन संदर्भातल्या चर्चेला उधान आले होते. दरम्यान, औरंगाबादचे प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा माहिती अधिकारी मुकूंद चिलवंत आणि मनपाचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनची चर्चा फेटाळली आहे. अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेतला नाही असे त्यांनी सांगितले. केवळ सोशल मीडियावर या प्रकारच्या चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले.

पण रविवारी किंवा सोमवारी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांची संयुक्त बैठक होण्याची शक्यता आहे. यावेळी बैठकीत लॉकडाऊन करायचा की आणखी काही पर्याय असेल याचा विचार केला जाणार असल्याचे समजते. दरम्यान, चुकीच्या माहितीमुळे औरंगाबादमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण परसले आहे. एवढा मोठा मुद्दा चर्चेत येऊनही मनपाचे आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय माध्यमांना याबाबतची निश्चित माहिती देत नाहीयेत. त्यांना फोन केल्यावर त्यांनी उचचला नाही.

लॉकडाऊनबद्दल कोणताही निर्णय नाही
तूर्तास जिल्ह्याच्या लॉकडाऊनबद्दल कोणताही निर्णय नाही. सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीनूसार निर्णय घेऊ. निर्बंध वाढवण्यात येईल. सर्व गोष्टीवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे.
– प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे

महत्वाच्या बातम्या