fbpx

सांगा खा.गायकवाडसाहेब कोणत्या तोंडाने मत मागायला जायचं

बार्शी: आगामी लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. यामध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना पुन्हा एकदा शिवसेनेकडून संधी मिळणार असल्याचं बोलल जात आहे. मात्र गायकवाड यांना उमेदवारी देण्यास मतदारसंघातील अनेकांचा विरोध असल्याचं दिसत आहे. यामध्ये बार्शीचे शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी उघडपणे रविंद गायकवाड यांना उमेदवारी दिली जाऊ नये, असा पवित्रा घेतला आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेला मानणारा वर्ग मोठ्या संख्येने आहे. त्यामुळेच 1996, 1999, 2004 आणि २०१४ मध्ये सेनेला येथे यश आले आहे. पक्षाने कोणताही उमेदवार दिला तरी शिवसैनिकांनी आजवर एकदिलाने त्याला विजयी करण्यासाठी मेहनत घेतलेली आहे. मात्र २०१४ मध्ये खासदार झालेले रवींद्र गायकवाड यांनी विजयी झाल्यानंतर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या बार्शी विधानसभा क्षेत्रात विकासकामे केली नसल्याचा आरोप खुद्द शिवसैनिकांकडूनच करण्यात येत आहे.

२०१४ साली रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी द्यावी यासाठी आम्ही मातोश्री दरबारी प्रयत्न केले. बार्शी तालुक्यामध्ये त्यांच्यासाठी जवळपास १०२ सभा घेतल्या. २००९ च्या तुलनेत ५६ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवले. मात्र मागील साडेचार वर्षात खा. गायकवाड यांनी विरोधकांना मदत केली. त्यामुळे आगामी निवडणुकीत गायकवाड यांना उमेदवारी देवू नये यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लेखी कळवल्याचं भाऊसाहेब आंधळकर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, शिवसैनिकांचा विरोध डावलत रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी दिल्यास बार्शी तालुक्यातील शिवसैनिक मतदारांच्या दारात मते मागायला जाणार नाहीत असा इशारा देखील आंधळकर यांनी दिला आहे.

1 Comment

Click here to post a comment