Telegram- टेलिग्रामनेही केली स्नॅपचॅटची कॉपी

टेलिग्राम या लोकप्रिय मॅसेंजरने स्नॅपचॅटची कॉपी करत पर्सनल चॅटींग करतांना ठाराविक वेळाने नष्ट होणार्‍या संदेशांची सुविधा प्रदान केली आहे.

फेसबुकसह अनेक कंपन्या स्नॅपचॅट या टीन एजर्समध्ये तुफान लोकप्रिय असणार्‍या अ‍ॅपची कॉपी करतांना दिसून येत आहेत. यात आता टेलिग्रामचीही भर पडली आहे. आपल्या अत्यंत अभेद्य अशा एंड-टू-एंड एनक्रिप्शनसाठी ख्यात असणार्‍या टेलीग्राममध्ये खरं तर आधीच सिक्रेट चॅट या पध्दतीने चॅटींग करतांना समोरील व्यक्तीने वाचल्यानंतर संबंधीत मॅसेज नष्ट होण्याची सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे. मात्र आता साध्या पध्दतीने पर्सनल चॅटींग करतांनाही अशाच पध्दतीने नष्ट होणारा मॅसेज पाठविता येणार आहे. टेलिग्रामच्या ताज्या अपडेटमध्ये ही सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात संदेश, प्रतिमा वा व्हिडीओ पाठवितांना टायमरच्या मदतीने याची वेळ सेट करता येईल. अर्थात यानुसार समोरच्या व्यक्तीने संदेश पाहिल्यानंतर तो त्या वेळेनंतर आपोआप नष्ट होऊ शकतो. याशिवाय ताज्या अपडेटमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा फोटो एडिटर देण्यात आला आहे. तसेच कुणीही आपल्या प्रोफाईलमध्ये थोडक्यात आपला परिचय देऊ शकेल.