‘हा’ व्हिडीओ ठरला प्रणय आणि अमृताच्या आनंदी आयुष्याच्या शेवटास कारण

टीम महाराष्ट्र देशा : तेलंगणातील ‘ऑनर किलिंग’ प्रकरणामुळे देश हादरला आहे. आपल्या मुलीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडील टी. मारुती राव यांनी ख्रिश्चन दलित समाजातील पेरुमला प्रणय याची हत्या करण्यासाठी एक कोटींची सुपारी दिली होती. त्यानंतर, मारेकऱ्यानं भर रस्त्यात अमृतासमोरच प्रणयवर वार केल्याचा भीषण व्हिडीओ सोशल मीडियावर फिरतोय. परंतु, अन्य एक व्हिडीओच या हत्येमागचं प्रमुख कारण ठरल्याचं चौकशीतून समोर आलं आहे.

हैदराबादपासून ८० किलोमीटरवरील एका भव्य राजवाड्यात अमृता आणि प्रणय यांनी प्री-वेडिंग व्हिडीओ शूट केला होता. एखाद्या सिनेमातील गाणं असावं असंच हे शूटिंग झालं होतं. त्यात दोघंही खूप खूश दिसताहेत. हा व्हिडीओ अमृताने आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केला होता. त्यावर, लाईक्सचा पाऊस पडला खरा, पण आपली मुलगी खालच्या जातीच्या मुलासोबत इतकी आनंदात आहे, हे अमृताच्या वडिलांना बघवलं नाही. त्यांच्या रागाचा भडका उडाला आणि ‘सैराट’ची पडद्यावरची कथा तेलंगणात प्रत्यक्षात घडली. प्रणयची हत्या करायची, त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करायचा, तो व्हिडीओ व्हायरल होईल आणि हा प्रेमाचा व्हिडीओ झाकोळून जाईल, असा टोकाचा विचार करून त्यांनी जावयाच्या हत्येसाठी एक कोटींची सुपारी दिली.

१४ सप्टेंबरला तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यातील हॉस्पिटलबाहेर प्रणयची हत्या करण्यात आली. गर्भवती अमृताला तो चेक-अपसाठी घेऊन आला होता. तिथून परतत असताना अमृतासमोर, भर रस्त्यातच हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने वार केले. या प्रकारामुळे अमृताला मोठा मानसिक धक्का बसला आहे, पण वडिलांविरोधात लढून प्रणयला न्याय मिळवून देण्याचा निर्धार तिनं केला आहे. मात्र, ज्यावेळी प्रणय आणि अमृताने हा व्हिडीओ शूट केला असेल तेव्हा स्वप्नात सुद्धा हाच व्हिडीओ आपल्या आनंदी आयुष्याच्या शेवटास कारण ठरेल असा विचार केला नसेल.