fbpx

तेजप्रताप, ऐश्वर्या अडकले विवाहबंधनात; नितीशकुमार यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती

पाटणा – बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि राबडीदेवी यांचे पुत्र तसेच बिहारचे माजी आरोग्य मंत्री तेजप्रताप यादव यांचा विवाह काल संपन्न झाला. तेजप्रताप यादव यांनी राजदचे आमदार चंद्रिका राय यांची कन्या ऐश्वर्या राय हिच्याशी विवाह केला.

दरम्यान या व्हीआयपी लग्न सोहळ्याला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी तसेच बॉलिवूडकरांनीही हजेरी लावली.या विवाह सोहळ्यासाठी लालूंना ५ दिवसांचा पेरॉल मंजूर करण्यात आला होता. लालू सध्या चार घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत. दरम्यान लालू प्रसाद यादव आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. मात्र आपल्या मुलाच्या लग्न-सोहळ्या प्रसंगी लालूंनी सगळे विसरत नितीशकुमार यांची गळाभेट घेतली तसेच नितीशकुमार यांनी नवदाम्पत्यास आशीर्वाद देखील दिले.

नितीश कुमार यांच्याशिवाय या विवाहसोहळ्यात माजी लोकसभा अध्यक्ष मीराकुमार यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह, राम जेठमलानी, अखिलेश यादव, डिंपल यादव यांनी हजेरी लावली होती. हा सोहळा खास बनवण्यासाठी कोणतीही कसर ठेवण्यात आली नव्हती. या सोहळ्याला ७००० पेक्षा अधिक पाहुण्यांनी हजेरील लावली.