धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ ; पाकिस्तानसह ऑस्ट्रेलियालाही टाकले मागे

team india

श्रीलंका : भारताची ‘युवा’ टीम सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेटने विजय मिळवला. दुसरा सामना जिंकत टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली. या विजयासह टीम इंडियाने एक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम टीम इंडियाने हा सामना जिंकून केला आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला आतापर्यंत 93 वेळा हरवले आहे. धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचा विक्रम मोडला आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 92 वेळा पराभव केला आहे, तर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 92 एक दिवसीय सामने जिंकले आहेत. आता या यादीत पहिले स्थान टीम इंडियाने पटकावले आहे.

भारताला विजयासाठी 276 धावांची गरज असताना पहिल्या आणि मधल्या फळीतील आघाडीचे बॅट्समन स्वस्तात माघारी परतले. 193 धावांवर सात विकेट्स असताना विजयाची आशा मावळली होती. हातात ३ विकेट्स असताना ८३ धावांची गरज होती. अशात दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमारने केलेली भागीदारी ही निर्णायक ठरली. या दोन्ही खेळाडूंनी संयमी खेळी केली आणि श्रीलंकेच्या घशातून हा विजय खेचून आणला.

दरम्यान, टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना 23 जुलैला खेळला जाईल. हा सामना औपचारिक असला तरी टीम इंडियाला बेंच स्ट्रेंथ आजमावण्याची चांगली संधी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP