पुजाराची सेंच्युरी, बॉक्सिंग डे कसोटीत भारत मजबूत स्थितीत

टीम महाराष्ट्र देशा – चेतेश्वर पुजाराने सातत्यपूर्ण कामगिरीची लय कायम राखत मेलबर्नवर सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपले वर्चस्व गाजवले. त्याने कसोटी कारकिर्दीतील १७ वे शतक पूर्ण केले.

दरम्यान,चेतेश्वर पुजारा (106) आणि कर्णधार विराट कोहली (82) यांनी उभ्या केलेल्या डोलाऱ्यावर अन्य फलंदाजांनी धावांचे इमले रचले. भारताने बॉक्सिंग डे कसोटीतील पहिला डाव 7 बाद 443 धावांवर डाव घोषित केला. मयांक अग्रवाल, विराट कोहली, रोहित शर्माची अर्धशतकं आणि चेतश्वर पुजाराचं खणखणीत शतकाच्या जोरावर भारतानं आज दिवसभर कांगारुंच्या गोलंदाजांची पिसं काढली. संयम आणि वेग याचा उत्तम मिलाफ आज भारतीय फलंदाजांच्या खेळात बघायला मिळाला. चेतश्वर पुजारानं १०६ धावा काढल्या. तर विराट कोहली ८२ धावांची बहुमोल खेळी केली.

अजिक्य राहणे आणि रोहित शर्मा या दोन्ही मुंबईकरांनी अर्धशतकी भागीदारी करून भारताची धावसंख्या साडे तीशनेच्या पलिकडे नेली. राहणे बाद झाल्यावर रिषभ पंतनं धावांचा रतीब कायम राखला. अखेर पंत आणि जडेजा तंबूत परतल्यावर विराट कोहलीनं सरप्राईज देत डाव घोषित केला.

तत्पूर्वी,कसोटीत कमबॅक करणाऱ्या रोहित शर्माने (63*) अर्धशतकी खेळी करून चाहत्यांना खूश केले. ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर एकही विकेट न गमावता 8 धावा केल्या आहेत. ते 435 धावांनी पिछाडीवर आहेत.