माझ्या आयुष्यातील गुरु…

teachers in our life artical
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll
साधारणपणे सर्व शाळेत आणि महाविद्यालयात नियमितपणे म्हंटला जाणारा हा श्लोक सर्वांनाच परिचित आहे परंतु, किती लोकांना या श्लोकाचा अर्थ माहित आहे? गुरू हे प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णु आणि शिव आहेत. ते साक्षात परब्रह्मच आहेत. अशा श्रीगुरूंना मी नमन करतो; असा या श्लोकाचा अर्थ आहे.
आषाढातील पौर्णिमेला व्यास पूजन करतात. या दिवशी ऋषी मुनींचे पूजन करण्याची प्रथा आहे त्यालाच आपण ‘गुरुपूर्णिमा’ म्हणून ओळखतो. प्रत्येक ऋषीने मानवी संस्कृती स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परंतु, व्यासांनी या साऱ्याचे एकत्रीकरण करून महाभारत नावाचा ज्ञानकोष निर्माण केला. हा ग्रंथ पाचवा वेद मानला जातो.
मी शाळेत असताना गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व शिक्षकांना त्यांच्या नेहमीच्या कामकाजातून विश्रांती देऊन आम्ही विद्यार्थिच त्या दिवशी ठराविक विद्यार्थी निवडून शाळेतील दैनंदिन कामकाज हाताळत असू अर्थातच, त्या गोष्टीला शिक्षकांची सहमती आणि मदत आम्हाला मिळत असे परंतू, शिक्षक खरचं नसतील तर काय अवस्था होईल? याचा थोड्याफार प्रमाणात का होईना अंदाज आम्हाला त्या वेळी येत असत.
शाळेत आणि महाविद्यालयात शिकवणारे शिक्षक आपले गुरू असतातच त्याच प्रमाणे, आई वडील घरातील इतर वडीलधारी माणसं आणि कळत नकळतपणे आपल्या व्यक्तिमत्वावर, शिक्षणावर, व्यवसायावर अनुकूल प्रभाव पडणारा प्रत्येक व्यक्ती हा आपला गुरूच असतो.
गुरू म्हणजे नेमकं काय?  तर वाईट मार्गापासून आपल्याला दूर ठेवणारा तर कधी वाईट मार्गातून आपल्याला बाहेर काढणारा वेळ प्रसंगी वाईट मार्गातूनही दिशा दाखवणारा आणि सतत आपल्या समोर येणाऱ्या अडचणींना आणि आव्हानांना सामोरं जाण्याची ताकद आणि आत्मविश्वास देणारा व्यक्ती, प्रत्येक गुरू आणि त्यांची शिकवण्याची सांगण्याची पद्धत जरी वेगळी असली, तरी देखील त्यांचं उद्दीष्ट एकचं असतं ते म्हणजे आपल्या शिष्याला प्रत्येक परिस्थितीला आणि आव्हानांना सामोरं जाण्याचं सामर्थ्य मिळवून देणं.
आजकाल बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस त्याच प्रमाणे त्यासाठी निरनिराळ्या खासगी आणि सरकारमान्य संस्था कार्यरत आहेत. बऱ्याच वेळा वाढत्या महागाई अथवा त्यांच्या व्यावसाईक गरजा भागवण्यासाठी आणि स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी या संस्था तसेच शाळा, महाविद्यालये नकळतपणे का होईना पण मोठ्या प्रमाणात त्यांच्या व्यवसायाचे बाजारीकरण करताना आपल्याला दिसतात परंतु ,शिक्षणाच्या बाबतीत तरी असे होऊ नये आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या शिक्षणाचा अधिकार हा मुबलक दरात आत्मसात करता यावा आणि गुरू शिष्याच असलेले हे पवित्र नातं असेच टिकून राहावे हीच इच्छा या गुरुपौर्णिमेच्या दिनानिमित्त मी व्यक्त करते.
लेखक
पूजा प्रमोद वैद्य