शिक्षकांच्या मागण्यांची दखल, पण गुणवत्ता हवीच

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक संघटनेलाही बजावले

टीम महाराष्ट्र देशा –  शिक्षकांना वेतनश्रेणी नियमाप्रमाणे सुरूच आहेच. मात्र शिक्षकांच्या वेतनश्रेणीसाठी जे निकष ठरविण्यात आले आहेत, ते पूर्ण करणे शिक्षक व शाळांना बंधनकारक आहे. शिक्षक संघटनांनी केलेल्या मागण्यांची दखल शिक्षण विभागाकडून घेण्यात येत आहे. मात्र गुणवत्तेची तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे सांगत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक संघटनेलाही बजावले.

राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येत शिक्षण विभागाच्या निर्णयाच्या विरोधात मोर्चा, आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत शिक्षण विभागाची भूमिका मांडली. शिक्षकांची कुठलीही वेतनश्रेणी थांबविली नाही. मात्र वेतनवाढ देताना शाळा सिद्धी अंतर्गत जे निकष निश्‍चित केले आहेत, ते निकष पूर्ण करणे आवश्‍यक आहे. शाळांना अ दर्जा असावा, शाळा प्रगत असावी, असे निकष पूर्ण केले तरच वेतनवाढ दिले जाणार आहे. राज्यातील 70 टक्‍के शाळांनी हे निकष पूर्ण केले आहेत, त्यांना वेतनश्रेणी देण्यास काहीच अडचण नाही. मात्र उर्वरित 30 टक्‍के शाळांनी हे निकष पूर्ण करणे बंधनकारक आहे. यात शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी, हा एकच हेतू आहे, असेही तावडे म्हणाले

. शिक्षकांना 2005 पासून जुन्या पद्धतीने पेन्शन योजना लागू करण्याची मागणी होत आहे. हा निर्णय धोरणात्मक असून, त्याबाबत केवळ शिक्षकांनाच पेन्शन योजना लागू करणे शक्‍य नाही. त्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागेल, असे सांगून तावडे यांनी पेन्शन योजना शिक्षकांना अप्रत्यक्ष लागू होणार नसल्याचे सांगितले. शिक्षकांच्या बदल्या ग्राम विकास खात्याकडून होत आहे.

ह्या बदल्या आता उन्हाळी सुटीनंतर केले जातील, असेही तावडे म्हणाले. शगुनचा भार शिक्षकांवर नाही सरल प्रणालीत विद्यार्थ्यांची माहिती भरताना शिक्षकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याबाबत तावडे म्हणाले, सरल प्रणाली योग्य पद्धतीने सुरू आहे. मात्र शगुन या संगणक प्रणालीवर शिक्षकांना माहिती भरावे लागणार नाही. केंद्रस्तरावरील सर्व शिक्षा अभियान अंतर्गत हे प्रणाली सुरू होत आहे. त्यात शिक्षकांनी केलेले ऍप, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनविलेली अध्यापन पद्धती ही माहिती विद्या प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर नमूद केली जाते. तीच माहिती शगुनवर भरावी लागेल. त्यासाठी शिक्षकांवर भार टाकला जाणार नसल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले.