नागपुरात लाखाची चहा-कॉफी

blank

टीम महाराष्ट्र देशा : चहा आणि कॉफी काहींना अतीच प्रिय असतो. दिवसभरात कितीतरी वेळा आपण चहा घेत असतो. मित्र भेटला, चल चहा प्यायला… ऑफिसमध्ये मीटिंग असली, तर चहा, कॉफी…. पण जर या चहा-कॉफीचे बिल लाखात आले तर… कल्पनाच सहन होत नाही ना… पण अशी घटना घडलीये, चक्क नागपूर विद्यापिठात.

नागपूर युनिव्हर्सिटी बोर्ड ऑफ स्टडीजच्या (बीओएस) तीन सदस्यांची बैठक नुकतीच पार पडली आणि या बैठकीत आलेलं चहा नाश्त्याचं बिल पाहून सर्वांचेच डोळे पांढरे झाले. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत बीओएसचे केवळ तीन सदस्य सहभागी झाले होते. या दोन दिवसीय बैठकीत त्यांनी तब्बल ९९ कप चहा आणि २५ कप कॉफी मागवल्याचा उल्लेख बिलामध्ये करण्यात आला आहे.

नागपूर विद्यापीठात झालेल्या तीन सदस्यांच्या या चहा- कॉफीचे तब्बल दीड लाखांचे बिल आल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, हे बिल जेव्हा विद्यापीठाचे कुलगुरू एस.पी.काणे यांच्याकडे पाठविण्यात आले, तेव्हा त्यांनाही मोठा धक्काच बसला. या बिलाला नकार देत आर्थिक विभागामार्फत तपास सुरु करण्यात आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

दरम्यान, हे बिल जेव्हा अकाऊंट विभागाच्या राज हिवासे यांच्याकडे आले, तेव्हा त्यांनी याबाबत कुलगुरूंकडे तक्रार केल्याचेही विद्यापिठातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. “आम्ही या बिलाला मंजुरी देण्यास नकार दिला आणि संबंधित विभागाकडे ते बिल पुन्हा पाठवून दिले. तसेच केवळ चहा आणि कॉफीचे बिल इतके कसे आले याबाबत संबंधित विभागाला स्पष्टीकरण देण्यासही सांगण्यात आले आहे. जर हे बिल योग्य असेल तर सिद्ध करावे”, असेही सांगण्यात आल्याचे हिवासे यांनी सांगितले.

नागपूर विद्यापिठाचे शैक्षणिक सत्र आणि अभ्यासक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी गेल्या महिन्यात बोर्ड ऑफ स्टडीजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यामध्ये सहभागी झालेल्या सदस्यांच्या चहानाश्त्याची व्यवस्था विद्यापीठाकडूनच करण्यात आल्याची माहिती कुलगुरूंनी दिली आहे.