भाजपाला मोठा धक्का ; टीडीपी एनडीएतून बाहेर

टीम महाराष्ट्र देशा- एनडीएला मोठा धक्का मिळाला आहे. तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी याबाबत घोषणा केली.अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांना आज मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे आदेश चंद्राबाबूंनी दिले आहेत.

विभाजनानंतर आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यावरुन केंद्र सरकार आणि आंध्र प्रदेशच्या सरकारमध्ये तणावाचे वातावरण होते. दरम्यान, आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देता येणार नाही. मात्र, राज्यासाठी विशेष पॅकेज देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी पत्रकार स्पष्ट केले. मात्र, यावर समाधान न झाल्याने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रातील आपले मंत्री अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे टीडीपी अखेर एनडीएतून बाहेर पडल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

आंध्र प्रदेशला विशेष पॅकेज देण्यास आम्ही तयार आहोत, मात्र विशेष राज्याचा दर्जा देता येणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल स्पष्ट केले होते. त्यानंतर तडजोडीला नकार देत एनडीएतून बाहेर पडण्याचा टोकाचा निर्णय टीडीपीनं घेतला.
टीडीपी आणि चंद्राबाबूंचं महत्त्व

चंद्राबाबू नायडू हे तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वात एनडीएच्या स्थापनेपासून टीडीपी एनडीएत आहे. 2014 साली त्यांनी भाजपसोबत निवडणूक लढवत विभाजीत आंध्र प्रदेशमध्ये एकहाती सत्ता मिळवली. ते 1994 ते 2004 असं सलग दहा वर्षे संयुक्त आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर 2004 ते 2014 या काळात त्यांच्याकडे आंध्र प्रदेश विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी होती. 2014 साली सत्ता मिळवत ते पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

टीडीपी हा दक्षिण भारतातील महत्त्वाचा पक्ष आहे. आंध्र प्रदेश विधानसभेत सध्या 175 पैकी 125 जागा टीडीपीकडे आहेत, तर भाजपच्या केवळ 4 जागा आहेत. विरोधी पक्षात असलेल्या वायएसआर काँग्रेसच्या 46 जागा आहेत. टीडीपीची एकहाती सत्ता असलेल्या आंध्र प्रदेशमध्ये भाजपसाठी चंद्राबाबूंची नाराजी हा मोठा धक्का आहे. कारण, 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशच्या 25 लोकसभेच्या जागांपैकी 17 जागांवर टीडीपीने विजय मिळवला होता.

You might also like
Comments
Loading...