#देवमाणूस : टाटांची आता ‘नो लिमिट’ योजना; देशाच्या संकटात २ हजार कोटींची मदत

मुंबई : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने थैमान घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून आरोग्य व्यवस्थेवर देखील मोठा ताण निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला लॉकडाऊन लावण्याचा सल्ला दिला असून देशातील परिस्थितीवरून झापलं आहे.

अशातच, कधी ऑक्सिजन, कधी व्हेंटीलेटर्स, कधी रुग्णालय तर कधी आर्थिक साहाय्य अशी मदत करणाऱ्या टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटांनी देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठी आता ‘नो लिमिट’ मदत करण्याचे ठरवले आहे. रतन टाटा आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या पुढाकाराने ‘नो लिमिट’ (अमर्यादित) मदतीची एक योजना आखली आहे.

टाटा समूह या योजनेसाठी तब्बल २००० कोटी रुपये खर्च करणार आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात टाटा समूहाची जो नफा झाला त्याच रकमेतून २००० कोटी रुपये टाटा समूह गुंतवत असल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर आता टाटा समूह लस उत्पादक कंपन्यांसोबतही करार करण्याचा विचार करत आहे, अशी माहिती इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स एन्ड एअरोस्पेस आणि टाटा सन्सचे अध्यक्ष बनमाली अग्रवाला यांनी इकोनॉमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीतून समोर आली आहे.

टाटा समूहाच्या कंपन्या एकत्र रक्कम गोळा करून हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन पुरवठा, आवश्यक उपकरणे आणि आपल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण या गोष्टींसाठी साहाय्य करणार आहेत. यामुळे देशातील आरोग्य व्यवस्था अधिक भक्कम होण्यास मोठी मदत होणार आहे.

महत्वाच्या बातम्या