‘राजीनामा देण्यापूर्वी शरद पवारांशी बोलायला हवं होतं’

नवी दिल्ली : शरद पवार यांनी राफेलवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू घेतल्याने तारिक अन्वर यांनी नाराजी व्यक्त केली होती. पक्षाचे संस्थापक सदस्य असणारे खा. तारिक अन्वर यांनी तडकाफडकी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता अन्वर यांना आपल्या कृतीवर खंत व्यक्त केली आहे.

शरद पवार यांच्याशी काहीही न बोलता अन्वर यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. परंतु मी राजीनामा देण्यापूर्वी शरद पवारांशी बोलायला हवं होतं असं तारिक अन्वर यांनी वक्तव्य केलं आहे. नवभारत टाईम्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अन्वर यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान तसेच पवारांच्या वक्तव्यानंतर ते आपली बाजू मांडतील असं मला वाटत होतं. त्यासाठी मी दोन दिवस वाटही बघितली परंतु पवार यावर काहीही बोलले नाहीत. त्यामुळे मी तडकाफडकी राजीनामा दिला. परंतु राजीनामा देण्यापूर्वी मी पवारांशी बोलायला हवं होतं असं अन्वर यांनी म्हटलं आहे.

राफेल प्रकरणावरून मोदींच्या हेतूविषयी जनतेला संशय नाही, असं बोलून पवार साहेबांनी जनतेच्या भावनांचा अनादर केल्याचं तारिक अन्वर त्यावेळी म्हणाले होते. राफेल डील संदर्भातील पवार साहेबांचं विधान अनेक तास मीडियामध्ये व्हायरल होत होतं. परंतु पवार साहेबांनी त्यावर कोणताही खुलासा केला नाही. विधान चुकीचं होतं मग पवारांनी स्पष्टीकरण द्यायला हवं होतं असं म्हणत अन्वर यांनी थेट शरद पवार यांच्यावरच हल्लाबोल केला होता.