कचराकोंडीवरुन औरंगाबाद मध्ये ‘सुपारीबाज’ उद्योग सुरु- शिवसेना

udhav thakare

मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये औरंगाबादमधील कचराकोंडीवरुन भाजपवर निशाणा साधला आहे. ”कचऱ्याच्या नावाखाली गलिच्छ राजकारण करत महापालिकेला, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना झोडपणे, नगरसेवकांची टिंगलटवाळी करणे असे ‘सुपारीबाज’ उद्योग औरंगाबाद मध्ये सुरु आहेत. असे सामना संपादकीयमध्ये म्हटले आहे.

सामना अग्रलेखातील प्रमुख बाबी 

कचऱ्याचे व्यवस्थापन करणे ही महापालिकेची जबाबदारी असली तरी केवळ एकटय़ा महापालिकेवर ही जबाबदारी ढकलून चालणार नाही. महापालिकेचे प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याबरोबरच राज्य सरकार आणि सर्वच राजकीय पक्ष संघटनांनी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्रितपणे यातून मार्ग काढायला हवा.

”कचरा डेपोंमध्ये प्रदूषणाचे डोंगर वाढवणे हा त्यावर उपाय खचितच नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी आणि स्वच्छतेचे पोकळ ढोल बडवण्यापेक्षा कचरा निर्मूलनासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत एक राष्ट्रीय धोरणच आखायला हवे. अन्यथा औरंगाबादच नव्हे, तर महाराष्ट्र व देशभरात भेडसावत असलेली ‘कचराकोंडी’ची गोष्टही कधीच संपणार नाही.

” सोशल मीडियावरूनही बरीच दुर्गंधी पसरवली जात आहे. उपद्रवी मंडळींचा कंडू त्यामुळे शमत असेलही, पण त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न सुटणार नाही”, कचराप्रश्नावरुन शिवसेनेला कोंडीत धरू पाहणा-यांवर सामनातून टीकास्त्र सोडले आहे.