तानाजी मालुसरे आता मोठ्या पडद्यावर: अजय देवगन साकारणार भूमिका

मुंबई: ‘शिवाय’ या धमाकेदार अ‍ॅक्शन सिनेमानंतर अभिनेता अजय देवगण आणखी एका धमाकेदार अ‍ॅक्शन सिनेमासाठी सज्ज झाला आहे. यावेळी तो एका ऎतिहासिक सिनेमात बघायला मिळणार असून यात तो तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे. Taanaji – The Unsung Warrior असे या सिनेमाचे नाव असून नुकतेच या सिनेमाचे पोस्टर अजयने आपल्या ट्विटर हँडल वर शेअर केले आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन ओम राऊत करणार आहे.
‘शिवाय’ या सिनेमाला जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर अजय देवगण पुन्हा एकदा अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. त्याच्या ‘बादशाहो’ चित्रपटाची  चर्चा जोरदार रंगली असतानाच त्याने गेल्या अनेक दिवसांपासून काम करत असलेल्या ‘तानाजी’ सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. यात तानाजी मालुसरे यांच्या शौर्याबद्दल दाखवलं जाणार असल्याने प्रत्येक मराठी माणसाला या सिनेमाची नक्कीच उत्सुकता लागली आहे.
ओम राऊत या तरूण दिग्दर्शकाने याआधी लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित लोकमान्य या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. आता ‘तानाजी’च्या माध्यमातू तो पुन्हा एकदा भेटीस येणार आहे. अजय देवगण हा सिनेमा करत असल्याने या प्रोजेक्टकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहे. ‘जोधा अकबर’, ‘बाजीराव मस्तानी’ नंतर या सिनेमाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराजांसाठी जीवाची बाजी लावणा-या तानाजी मालुसरे यांच्या शौर्यावर या सिनेमातून प्रकाश टाकला जाणार असल्याने त्यांनी दाखवलेलं शौर्य, महाराजांसाठी दिलेलं जीवदान हे रूपेरी पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.