fbpx

विद्यमान राज्यपालांकडूनच महिला पत्रकाराचा विनयभंग

टीम महाराष्ट्र देशा : सध्या तामिळनाडू मध्ये सेक्स फॉर डिग्री या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी मदुराई कामराज विद्यापीठातील वरिष्ठांशी लैंगिक संबंध ठेवावे लागतील, अशी ‘ऑफर’ विरुधुनगर महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका निर्मला देवी यांनी चार विद्यार्थिनींना दिली होती. याप्रकरणाचा संबंध थेट राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याशी असल्यानं तामिळनाडूत मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

हे प्रकरण गाजत असतानाच राज्यपालांनी एका महिला पत्रकाराला तिच्या संमतीविना स्पर्श केल्यानंतर ते पुन्हा एकदा नव्या वादात सापडले आहेत. यानंतर महिला पत्रकारानं ट्विट करत याबद्दल मोठा संताप व्यक्त केला आहे. ‘पत्रकार परिषद संपताना मी तामिळनाडूच्या राज्यपालांना प्रश्न विचारला. मात्र उत्तर देण्याऐवजी त्यांनी माझ्या संमतीविना माझ्या गालाला स्पर्श केला,’ असं महिला पत्रकारानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, सेक्स फॉर डिग्री प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही, असा दावा राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी पत्रकार परिषदेत केला. राज भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेनंतर राज्यपाल पुरोहित यांनी ही हरकत केली आहे.