मावळातला स्वर्ग एकदा तरी नक्कीच जायला हव…

पुणे ते किल्ले घनगड

विरेश आंधळकर – डोक्यावर संतधार पाऊस, किर्रर्रर्रर्र करणारा मात्र कानांना हवासा रान किड्यांच्या आवाज, बेडकांची डराव-डराव, पक्षांचा किलबिलाट, जिकडे बघाव तिकडे हिरवाई आणि डोंगरावरून मुक्तपणे वाहणारे एक-दोन नव्हे तर शेकडो धबधबे, ना हॉर्नचा गोंगाट ना माणसांच्या गर्दीतील हरवलेले आपण. आता हे सर्व अनुभवायच असेल तर तुम्ही म्हणाल आपल्याला महाराष्ट्र सोडून शिमला, आसाम, म्हैसूर उटी या अशा ठिकाणी जावं लागेल. पण जरा थांबा तुम्हाला हे सर्व अनुभवण्यासाठी आपला महाराष्ट्र सोडून दुसरीकडे कुठं जाण्याची गरज नाही.

हे फोटो पाहून कुठल्यातरी चित्रपटाच्या शुटिंगचा सेट आहे असं वाटेल पण हे निसर्गरम्य दृष्य आहेत आपल्याच महाराष्ट्रातील घनगड किल्ला आणि त्याच्या परिसराचे.

पुणे शहरापासून अंदाजे 85 किलोमीटर वर मुळशी तालुक्यात एकोले भांबर्डे  हे गाव आहे. याच गावामध्ये आहे तो घनगड किल्ला. पुण्यातुन चांदणी चौक – पौड मार्गे ताम्हिणी घाट आणि पुढे भांबर्डे – एकोले गाव असा मार्गक्रमण करत आपण पोहचतो ते घनगड किल्ल्याजवळ. सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे ताम्हिणी घाटापासून सुरू होणार निसर्ग सौंदर्य हे डोळे दिपवणार आहे. मुळशी धरणाच्या पश्चिमेला असलेल्या मावळाला ‘कोरसबारस’ मावळ म्हणतात. याच मावळात येणारा हा घनगड किल्ला.
घनगड किल्यावरची चढाई तशी इतर किल्यांच्या तुलनेत सोपी आहे. एकोले गावामध्ये आपली गाडी उभी करायची आणि थेट चालायला लागायचं ते किल्याकडे.

किल्याकडे मार्गक्रमण करत असताना वाटेत प्रथम दिसते ते गरजाई देवी मंदिर पुढे ते पार करून आपण पोहचतो ते किल्ल्याच्या द्वारावर. किल्ल्यामध्ये प्रवेश करताच उजवीकडे एक मोठा कातळ निखळून खाली आला आहे तो कायम आपल्याला फोटो काढण्यासाठी आकर्षित करतो.  पुढे दोन गुहा आहेत त्यातील एका गुहेत वाघजाई देवीची मूर्ती विसावलेली आहे, त्या पुढे एक घसरडा कातळ टप्पा आहे तो पार करून देखील पाण्याचे टाके पाहता येतात. येथून पूढे किल्याच्या माथ्यावत जाण्यासाठी शिवाजीट्रेल ह्या संघटनेने लोखंडी शिडी आणि रोप बसवलेले आहेत त्याच्या आधारे आपण वर चढू शकतो.

किल्ला पाहिल्यानंतर आता वेळ येते ती निसर्गाच्या सौंदर्याची अनुभूती घेण्याची एकोले भांबर्डे गावामार्गे पुण्याकडे परतीचा प्रवास करत असताना वाटेत एका बाजूला हिरवेगार डोंगर आणि त्याच्यावरून वाहणारे पाण्याचे झरे तर दुसरीकडे भाताची शेती.

परतीचा मार्ग म्हणजे घराकडे जाण्याची ओढ, पण जरा थांबा आता तर खरी सुरुवात झाली आहे ती पर्यटनाची. भांबर्डे गाव सोडल्यानंतर अंदाजे पाच किलोमीटर वर एक छोटासा पूल लागेल. एका बाजूला डोंगर तर एका बाजूला पुलाखालून वाहणार पाणी. ह्याच पाण्याच्या बाजूने चालत चालत गेल्यावर पुढे जे काही येत ते तुम्हीच बघा

मग काय मित्रांनो करताय ना घनगडला जाण्याचा आणि महाराष्ट्राच्या या दौलतीची ओळख करून घेण्याचा प्लॅन. पण हा एक काळजी घ्या सध्या पावसाळा सुरू आहे किल्यावर निसरडी वाट आहे त्यामुळं उत्साहा बरोबर काळजी पण असावी

फोटो – किरण शिंदे, विरेश आंधळकर
ट्रेकर्स -दीपक पाठक, मंगेश शिंदे, विरेश आंधळकर

Comments
Loading...