Ajit Pawar | नागपूर : वाशिममधील गायरान जनिमीवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. मंत्री अब्दुल सत्तार यांनी वाशिम जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून तब्बल 150 कोटींचा घोटाळा केला. नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठानेही कठोर शब्दात ताशेरे ओढले, असा आरोप सोमवारी अजित पवार यांनी विधानसभेत केला.
अजित पवार म्हणाले, “उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ताशेरे ओढले आहेत. अब्दुल सत्तार महसूल राज्यमंत्री असताना वाशिम जिल्ह्यातील मौजे घोडबाबूळ येथील सरकारी गायरान जमीन गट क्रमांक 44 मधील 37 एक्कर 19 गुंठे जमीनीचा घोटाळा झाला. किंमत काढली तर हा घोटाळा 150 कोटींचा आहे. गायरान जमीनी कुणाला देता येत नाहीत, असा सुप्रिम कोर्टाचा निकाल आहे. त्याचे पालन आपण सर्वांनी केले आहे. तेव्हाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोर्टाचा निकाल आणि राज्य सरकारच्या आदेशाची संपूर्ण माहिती असताना 37 एक्कर गायरान जमीन योगेश खंडागळे या व्यक्तिला वाटप करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कायदेशीर बाबींचे उल्लंघन करणारा होता.”
अजित पवार म्हणाले, “तत्कालीन महसूल राज्यमंत्र्यांविरोधात ठोस पुरावे उपलब्ध आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय अवैध असल्याचे वाटले. त्यांनी 5 जुलै 2022 ला महसूलच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिलं. देवेंद्र फडणवीस त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते. शिंदे सरकार सत्तेत आले होते. त्यात वादग्रस्त आदेशाचा अंमल केल्यास कोर्टाचा अनादर होईल, असे कलेक्टरांनी नितीन करीरांना कळवले. या पत्रावर दुर्देवाने शासनाने अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. ही बाब अतिशय गंभीर आहे. यामध्ये राज्यमंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे. याची जबाबदारी स्वीकारून मंत्रिमहोदयांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे.”
अजित पवार म्हणाले, “आणखी एक गंभीर प्रकरण आहे. सिल्लोड येथे 1 ते 10 जानेवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय कृषि व क्रीडा महोत्सवासाठीही अब्दुल सत्तार यांनी कृषी विभागाला वेठीस धरून कोट्यवधी रुपयांची वसुली सुरू केली. त्यासाठी दहापेक्षा जास्त तालुके ज्या जिल्ह्यामध्ये आहेत त्यांनी प्लॅटिनिअम म्हणजे 25 हजार रुपयांच्या 30 प्रवेशिका खपवायच्या. डायमंड 15 हजारांच्या 50 प्रवेशिका खपवायच्या. 10 हजारच्या 75 प्रवेशिका खपवायच्या. साडेसात हजारांच्या सिल्वर 150 प्रवेशिका खपवायचे टार्गेट दिले आहे. हा भ्रष्टाचार नाही आहे का?. त्यामुळे संबंधित मंत्र्यांचा राजीनामा सरकारने केला.”
हा सगळा निर्लज्जपणाचा कळस-
अजित पवार म्हणाले, “अब्दुल सत्तार नेहमी वादग्रस्त वक्तव्य करण्यात चर्चेत असतात. खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषयी केलेलं बेताल वक्तव्य, जिल्हाधिकाऱ्यांना तू चहा पित नाहीस मग दारू पितोस का? हे कृषी मंत्री विचारतात. हा सगळा निर्लज्जपणाचा कळस आहे. तसंच लवकरात लवकर अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा. त्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. देवेंद्र फडणवीस तुमचे देखील 115 आमदार आहेत. तुम्ही देखील याला तेवढेच जबाबदार आहात. तुमच्याकडून महाराष्ट्रला अपेक्षा आहेत.”
महत्वाच्या बातम्या :
- PM Kisan Yojana | सरकारची कडक सूचना! 31 डिसेंबरच्या आधी शेतकऱ्यांनी पूर्ण करा ‘हे’ काम
- Ajit Pawar | कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा, अजित पवारांची सभागृहात मागणी
- R Ashwin | ‘ही’ कामगिरी करणारा रविचंद्रन अश्विन ठरला जगातील दुसराच खेळाडू
- Hritik Roshan | गर्लफ्रेंड सबा आणि मुलांसोबत ऋतिक रोशनचे सुट्टीचे फोटो व्हायरल
- Uddhav Thackeray | “मी तुम्हाला पेन ड्राईव्ह देणार…” ; उद्धव ठाकरे यांची टोलेबाजी