जिथे लाखोंची होतेय उधळपट्टी तिथेच यांचाही आदर्श घ्या, औरंगाबाद पालिकेच्या उद्यान विभागाची कौतुकास्पद कामगिरी!

औरंगाबाद : महापालिकेतील उधळपट्टीचे प्रकार वारंवार समोर येतात. पण उद्यान विभागाने ३६ नाल्यांच्या पुलावर लावण्यासाठी स्वतः जाळ्या तयार करत तब्बल एक कोटी रुपयांची महापालिकेची बचत केली आहे. अंदाजपत्रकानुसार जे काम सुमारे दोन कोटी रुपयांचे होते ते काम एक कोटी पाच लाख रुपयांमध्ये करण्यात आले आहे.

महापालिकेने राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात खाम नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उन्हाळ्यापासून खाम नदी पात्राची स्वच्छता केली जात असून, आत्तापर्यंत शेकडो टन प्लॅस्टिक कचरा उचलण्यात आला आहे. पुन्हा नदीपात्रात प्लॅस्टिक कचरा येऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. शहरातील नाल्यांतून वाहणारे पाणी पुढे खाम नदीच्या पात्रात येते. नाल्यातूनच प्लॅस्टिक कचरा येत असल्याचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या निर्शनास आले. नाल्याशेजारी राहणारे नागरिक नाल्यावर असलेल्या पुलावरून कचरा नाल्यात फेकतात.

त्यामुळे शहरातील सुमारे ३६ नाल्यांच्या पुलावर जाळ्या बसविण्याच्या सूचना पांडेय यांनी केली होती. जाळ्या बसविण्याची सूचना उद्यान अधीक्षक विजय पाटील व घन कचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांना देण्यात आली होती. अभियंता चांडक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डीएसआरनुसार अंदाज घेतला असता तब्बल दोन कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार होत होते. त्यामुळे प्रशासक पांडेय यांनी महापालिकेमार्फतच जाळ्या तयार करून त्या बसविण्याच्या सूचना केल्या.

त्यानंतर उद्यान विभागात वर्कशॉप सुरू करण्यात आले. अवघ्या महिन्याभरात प्रभाग एक मधील १६ ठिकाणी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. हे काम अंदाजपत्रकानुसार ३० ते ३५ लाखापर्यंत होते पण १५ लाखात हे काम पूर्ण झाले. आता उर्वरित प्रभागात काम सुरू करण्यात आले आहे. महापालिकेच्या इतर विभागात छोट्या-छोट्या कामासाठी उधळपट्टी केली जात असताना उद्यान विभागाने मात्र कमी खर्चात काम करून आदर्श निर्माण केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP