पक्षाचा दानवेंना आरामाचा सल्ला?

raosaheb-danve

टीम महारष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत भाजपचे स्टार प्रचारक तथा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आजारी आहेत. प्रचाराच्या दगदगीमुळे दानवे यांचा आजार अधिक बळावू नये, याची दक्षता भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतली असून, त्यांना पुरेसा आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

चार वेळा खासदार, एकदा आमदार राहिलेले रावसाहेब दानवे हे गेल्या तीस वर्षांपासून आपली सत्ता राखून आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळून त्यांची चार वर्षांपूर्वी प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली. या कालावधीत राज्यात झालेल्या विविध निवडणुकांत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे त्यांचे पक्षांतर्गत वजन कमालीचे वाढले आहे.

पक्षाच्या वाढीसाठी राज्यभर कराव्या लागणाऱ्या दौऱ्यांंमुळे दानवे हे काही दिवसांपासून आजारी आहेत. तत्पूर्वी औरंगाबादेतील त्यांच्या संपर्क कार्यालयाचे पाच एप्रिल रोजी उद्घाटन झाले. यावेळी भाषण करताना जीभ घसरण्याचा त्यांचा जुना ‘आजार’ पुन्हा बळावला. ‘पुलवामा येथील हल्ल्यात आपले 42 अतिरेकी शहीद झाले,’ असे वक्तव्य यावेळी या खासदारांनी केले होते.

राज्यात सध्या युती विरुद्ध महाआघाडी, असा लोकसभेचा रणसंग्राम ऐनभरात आलेला आहे. त्यातच राज्यभरात प्रचारसभांना हजेरी लावल्यास त्यांचा हा ‘आजार’ आणखी वाढत जाण्याची भीती असल्याने अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच हस्तक्षेप करावा लागला. ‘आजारा’वर उपचार करून घ्यावेत, तसेच पुरेसा आराम करूनच प्रचारास बाहेर पडावे, असा सल्ला नागपूरमधून देण्यात आल्याने खा. दानवे हे औरंगाबादेतील एका खासगी रुग्णालयात दाखल झाल्याची चर्चा आहे.

उमेदवारही म्हणाले, विश्रांती घ्या

Loading...

उकाड्यात खा. दानवे यांनी आपल्या प्रचारासाठी भाषणे करण्याऐवजी ‘आराम’च करावा, अशी अपेक्षा लोकसभेच्या रिंगणातील भाजप-शिवसेना युतीच्या राज्यभरातील उमेदवारांची होती. त्यांची अपेक्षा विचारात घेऊन भाजपनेदेखील खा. दानवे यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. येत्या दोन-तीन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. मात्र, राज्यभर प्रचार केल्यास पुन्हा ‘दगदग’ होण्यापेक्षा आपला जिल्हाच सांभाळावा, असेही त्यांना सांगण्यात आल्याची चर्चा आहे.