माझा राष्ट्रीय पुरस्कार परत घ्या- अक्षय कुमार

“मला 26 वर्षांनी पुरस्कार मिळालाय, जर तुम्हाला वाटत असेल तर तोही परत घ्या,” अशाप्रकारची तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेता अक्षय कुमारने दिली आहे. अक्षय कुमारला त्याच्या करियरमध्ये तब्बल 26 वर्षांनी पहिल्यांदाच ‘रुस्तम’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मात्र या पुरस्कारानंतर अनेक चर्चा ऐकायला मिळत होत्या त्यापैकी एक म्हणजे प्रियदर्शन राष्ट्रीय पुरस्कारांचे परीक्षक असल्याने अक्षय कुमारला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना तो म्हणाला की, ‘मी मागील 25 वर्षांपासून पाहत आलोय की, जेव्हा कोणीही पुरस्कार जिंकतो, त्यावर चर्चा होते. कायम कोणी ना कोणी वाद निर्माण करतोच. माझ्यासाठी ही नवी बाब नाही. ह्याला मिळायला नको, त्याला मिळायला हवा. ठीक आहे, मला 26 वर्षांनी पुरस्कार मिळालाय, जर तुम्हाला वाटत असेल तर तोही परत घ्या!’