मिठाई खरेदी-विक्री करताना खबरदारी घेण्याचे आवाहन

नाशिक : मिठाई तयार करताना अन्न सुरक्षा नियमानुसार सर्व तरतूदींचे पालन व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे विशेष मोहिम राबविण्यात येत असून तरतूदींचे उल्लंघन करणाऱ्यांना कारवाईला सामारे जावे लागेल, असे अन्न व औषध प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खवा, मिठाई, मावा उत्पादकांची सखोल तपासणी करण्याची मोहिम राबविण्यात येत असून संशयास्पद अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणाकरिता घेण्यात येत आहेत. सणाच्या काळात ग्राहमोठ्या प्रमाणात मिठाईचे सेवन करण्यात येते.

ग्राहकांनी नोंदणीधारक विक्रेत्याकडूनच मिठाई खरेदी करावी. खरेदी करताना बिलाशिवाय आणि उघड्यावरील मिठाई खरेदी करू नये. शक्यतो भडक खाद्यरंग असलेली मिठाई खरेदी करू नये. त्यात प्रमाणापेक्षा जास्त खाद्यरंग असण्याची शक्यता असते. खवा माव्यापासून तयार केलेल्या मिठाईचे सेवन २४ तासाच्या आत करावे.

बंगाली मिठाईचे सेवन आठ तासाच्या आत करावे. शिल्लक राहिलेली मिठाई फ्रिजमध्ये ठेवावी. मिठाईवर बुरशी आढळून आल्यास किंवा चवीत फरक जाणवल्यास ती सेवन न करता नष्ट करावी.

मिठाई खरेदी करतान शंका आल्यास सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन नाशिक विभाग उद्योग भवन पाचवा मजला कक्ष क्र. 21 व 23 आयटीआय सिग्नलजवळ सातपूर रोड नाशिक (दूरध्वनी क्र. ०२५३-२३५१२०४/२३५१२००) येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहआयुक्त उ.श.वंजारी यांनी केले आहे.