“माझ्यापेक्षा राज्याच्या आरोग्याची काळजी घे”, सुप्रिया सुळेंनी सांगितली टोपेंच्या मातोश्रींची आठवण…

Supriya sule

मुंबई: सद्या रराज्यातील कोरोना या संकटाशी खंबीरपणे झुंज देणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना काल मातृशोक झाला. त्यांच्या मातोश्री शारदा टोपे या प्रदीर्घ आजाराने त्रस्त होत्या. काल रात्री ९ च्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यानंतर राजकीय-सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. ‘ माझ्यापेक्षा राज्याच्या आरोग्याची काळजी घे’, असे त्यांच्या मातोश्रींनी राजेश टोपे यांना संगीतल्याच्या आठवणीला खासदार सुप्रिया सुळे यांनी उजाळा दिला.

काल रात्री, टोपेंच्या मातोश्रींची प्राणज्योत बॉम्बे रुग्णालयात मालवली. त्यानंतर सुळेंनी रुग्णालयात दाखल होत राजेश टोपे यांचे सांत्वन करत त्यांच्या मातोश्रींचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी ट्विट करत आठवणींना उजाळा दिला. “दवाखान्यात उपचार घेत असतानाही शारदाताईंनी राजेशभैय्यांना, माझ्यापेक्षा राज्याच्या आरोग्याची काळजी घे असंच सांगितलं.आपलं दुःख बाजूला ठेवत कोरोनाच्या संकटात ठामपणे उभा राहून त्याचा सामना करणारा राजेशभैय्या यांच्यासारखा पुत्र महाराष्ट्राला देणाऱ्या शारदाताई आज आपल्यातून गेल्या.”

दरम्यान, आई प्रदीर्घ आजाराने रुग्णालयात दाखल असताना कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यभरातील अनेक जिल्ह्यात दौरे करणे, परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणे, यामुळे राजेश टोपे यांचे कोरोना योद्धा म्हणून सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.”राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांची आजाराशी सुरु असलेली झुंज अखेर संपली. माजी खासदार अंकुशराव टोपे यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या.”असे देखील सुप्रिया सुळेंनी सांगितले.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

तर, चार वर्षांपूर्वीच राजेश टोपे यांचे वडील अंकुशराव टोपे यांचे निधन झाले होते. त्यानंतर आता आईचे देखील निधन झाल्याने टोपे पोरके झाले, अशी भावना देखील व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा कहर सुरु झाला तेंव्हा त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल केले.या काळात राजेशभैय्या आईच्या आजारपणाचं दुःख बाजूला ठेवून मैदानात उतरले. वडील अंकुश टोपे व आई शारदाताई यांची प्रसंगी आपले दुःख बाजूला ठेवून जनसेवेसाठी सर्वस्व झोकून देण्याची शिकवण त्यांनी अंमलात आणली.