सुनिल मगरे मृत्यू प्रकरणी ‘कारवाई करा अन्यथा’, वंचितने दिला तीव्र जनआंदोलनाचा इशारा!

औरंगाबाद : खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका रुग्णाची अचानक प्रकृती खालवल्याने त्याला रात्री डॉक्टरांनी घाटी रुग्णालयात पाठवले. मात्र, या रुग्णाला घाटीतील कर्मचार्‍याने ऑक्सिजनचे रिकामे सिलेंडर लावले. त्यामुळे त्या रूग्णाचा अपघात विभागात तडफडून मृत्यू झाला. सुनील रमेश मगरे (३८, रा. बापूनगर, खोकडपुरा) असे मृताचे नाव आहे. यांच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍या घाटी रुग्णालयाच्या दोषी डॉक्टरांची विभागीय चौकशी करण्यात यावी या मागण्यांसाठी शुक्रवारी (दि.३०) घाटीच्या अधिष्ठता डॉ. कानन येळीकर यांना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.

सुनील मगरे यांना पोट दुखीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना बायजीपुरा भागातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना निमोनिया झाल्याचे निदान झाले. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे त्यांना रात्री आठ वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी घाटीत हलवण्यास सांगितले. घाटीत नेल्यावर त्यांच्यावर अपघात विभागात तपासणी सुरू होती.

त्यानंतर आयपीडीमध्ये दाखल करण्यासाठी रूग्णवाहिकेत सुनीला हलवले. तत्पूर्वी सुनीलला तातडीने ऑक्सिजनची गरज भासली. मात्र, धक्कादायक म्हणजे कर्मचार्‍यांनी चक्क रिकामे सिलेंडर लावून दिले. रिकाम्या सिलेंडरमुळे सुनीलला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तेव्हा नातेवाईकांनीच पळत जाऊन तिसरे सिलेंडर आणले. पण तोपर्यंत सुनीलचा तडफडून मृत्यू झाला होता.

हे प्रकरण मेडिकल बोर्डसमोर ठेवावे, मगरे यांच्या कुटुंबाला १५ लाख आर्थिक मदत करावी, त्यांच्या कुटुंबातील एकास शैक्षणिक पात्रतेनुसार रुग्णालयाच्या सेवेत सामावून घ्यावे, भविष्यात असा प्रकार घडू नये यासाठी यासाठी कडक उपाययोजना राबविण्यात याव्या, तसेच यात दोषी संबंधित सर्व डॉक्टरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी वंचितचे शहर उपाध्यक्ष संदिप जाधव यांच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश हरबडे, डॉ.भारत सोनवणे, डॉ.मीनाक्षी भट्टाचार्य आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या