कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत चार लाख औरंगाबादकरांवर टांगती तलवार!

औरंगाबाद : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र शहरातील तब्बल चार लाख नागरिकांना कोरोना संसर्गाच्या तिसर्‍या लाटेत संसर्ग होण्याची भीती असल्याचे मत महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सोमवारी (दि.२१) व्यक्त केले. तसेच दुसऱ्या लाटेत जेवढे रुग्ण आढळून आले तेवढी रुग्ण संख्या तिसऱ्या लाटेत आढळून येणार नाही अशीही शक्यता पांडेय यांनी व्यक्त केली.

शहरात मार्च महिन्यापासून अचानकच रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली. घराघरात बाधित रुग्ण आढळून येत होते.  रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ३३ टक्क्यांवर गेला होता. मात्र प्रशासनाने होम आयसोलेशनची सुविधा उपलब्ध करुन दिली. कोविड सेंटर पुन्हा सुरु करण्यात आले. तपासणी, कडक निर्बंध, ब्रेक द चेन या सर्व उपाययोजनांमुळे बाधितांचे प्रमाण हळूहळू कमी होत गेले. सध्या एकुणच शहरात दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्यस्थितीत शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या ओसरल्याने निर्बंधांमध्ये शिथिलता आणत  बाजारपेठा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

त्यामुळे कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेची भीती तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यासाठी औरंगाबाद महापालिकेने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात पांडेय म्हणाले, शहरात १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या दहा लाख आहे. त्यापैकी तीन लाख ४० हजार नागरिकांनी एक किंवा दोन डोस घेतले आहेत. एक लाख नागरिकांना कोरोना संसर्ग होऊन गेला आहे. सुमारे दीड लाख नागरिक लक्षण नसलेले रुग्ण होते.

त्याचा एकत्रित विचार केला तर सुमारे सहा लाख नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडीज निर्माण झाल्या आहेत. त्यांना कोरोना संसर्गाची शक्यता तिसर्‍या लाटेत कमी आहे. उर्वरित चार लाख नागरिकांना तिसर्‍या लाटेत कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. ऑगस्ट महिन्यात शहरात कोरोनाचे रुग्ण वाढतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लग्नसमारंभावर निर्बंध कायम आहेत. एकूण ५९ टक्के उपस्थितीत हे कार्यक्रम घेता येतील. अंत्यविधीसाठी देखील निर्बंध कायम आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेण्यात आले आहे त्या कर्मचाऱ्यांना ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या