नेवासा तालुक्यातील आरोग्य विभाग झोपेत

नेवासा : भेंड्यातील एका महिलेचा स्वाईन फ्लूसदृश्य आजाराने मृत्यू झाला असून कुकाण्यातील एकाला स्वाईन फ्लू सदृश्य आजाराने ग्रासले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या दोन्ही गावांमध्ये स्वाईन फ्लू, डेंग्यूसारख्या आजारांची लागण झाली आहे.
भेंडा येथील नरेंद्रनगरमध्ये राहणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक ज्ञानदेव कचरे यांच्या पत्नी चंद्रकला कचरे (वय 55 ) यांचे सोमवार 1 ऑगस्ट रोजी निधन झाले. कामिका एकादशीनिमित्त नेवासा येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासठी कचरे दांपत्य गेले असता त्यादिवशी झालेल्या पावसात भिजले. त्यामुळे घरी आल्यावर दोघेही थंडी तापाने आजारी पडले. गावातच उपचार घेतल्यावर कचरे बरे झाले.
मात्र सौ. कचरेंचा आजार वाढून ताप, सर्दी होऊन श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने प्रथम कुकाणा नंतर नगर येथील रुग्णालयात तपासण्या करण्यात आल्यानंतर त्यांना पुुण्याला हलविण्यात आले. निमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती खालावत गेली.पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु यश न आल्याने त्यांची प्राण ज्योत मालवली.
त्यांचा मृत्यू निमोणियाने झाला आहे. दुसर्‍या घटनेत कुकाणा येथील व्यापारी राजेंद्र भंडारी (वय 55) हे दोन तीन दिवसांपासून आजारी असून त्यांच्यावर पुणे येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तेथे केलेल्या चाचण्यांमध्ये त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची त्यांचे निकटवर्तीयांनी दिली आहे.

भेंडा गावचे ग्रामदैवत श्रीसंत बागेबाबा यांची सोमवार व मंगळवार दोन दिवस यात्रा आहे. यात्रेसाठी या दोनही दिवस 50 हजारांपेक्षाही अधिक भाविकांची गर्दी असते.अशा वेळी स्वाईन फ्लूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे खबरदारी म्हणून भेंडा येथे यात्रेच्या वेळी विशेष आरोग्य पथक नेमावे.
संगीता गणेश गव्हाणे, सरपंच, भेंडा

कुकाणा परिसरात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळल्याने योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. भेंडा कुकाणा परिसरात आणखी काही रुग्ण आहेत का यांचेही सर्वेक्षण करण्यात येत असून स्वाईन फ्लूबाबत जनजागृती करण्यात येत आहे. स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य आजार असून जास्त गर्दीचे ठिकाणी जाणे टाळावे किंवा योग्य ती काळजी घ्यावी.
डॉ. रामेश्वर शिंदे, वैद्यकीय अधिकारी, कुकाणा