स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळ्याला डांबर फासणारे मोकाट

savarkar statue aurangabad

औरंगाबाद: त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्ष बहुमताने विजयी झाल्यानंतर २४ तासात लेनिनचे दोन पुतळे पाडण्यात आले. त्यापाठोपाठ तामिळनाडूत रामास्वामी पेरियार यांच्या पुतळ्याची नासधूस झाली. हि धगधग संवेदनशील औरंगाबादपर्यंत येऊन पोहोचली. शहरातील समर्थनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला डांबर फासण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीने केला. ती व्यक्ती अजूनही अटक झाली नसून मोकाट फिरत आहे.

आपल्या भावी पिढीला महापुरुषांचे स्मरण व्हावे आणि त्यांच्या विचारांचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित व्हावा, अशा ‘उदात्त’ हेतूने आपण पुतळे उभारतो. शहरात ठिकठिकाणी महानगरपालिका, विविध पक्ष, संघटनांनी महापुरुषांचे १६७ पुतळे उभारले आहेत. या पुतळ्यांपैकी केवळ ४० पुतळेच रीतसर परवानगी घेऊन उभारण्यात आलेले आहेत. उर्वरित १२७ पुतळे अनाधिकृत आहेत. या १६७ पैकी एकाही पुतळ्याला साधी सुरक्षाही नाही किंवा सीसीटीव्ही बसवण्याची तसदीही कुणी घेतलेली नाही. पुतळ्यांची सुरक्षा हा कळीचा मुद्दा असला तरी त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे.

शहरातील गल्लीबोळात नोंद नसलेलेही अनेक पुतळे आहेत. भावनेच्या भरात उभ्या केलेल्या पुतळ्यांकडे अनुयायांचे केवळ जयंती, पुण्यतिथी किंवा विटंबना झाली तरच लक्ष जाते. मात्र या ठिकाणी काही सुरक्षा व्यवस्था असावी याचे कुणालाही गांभीर्य नाही. पोलिसांवर असलेला कामाचा भार लक्षात घेता प्रत्येक पुतळ्याची सुरक्षा ठेवणे त्यांना शक्य नाही. किमान पुतळा उभारणाऱ्यांनी तरी त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत.

१६६ पुतळ्यांपैकी ४० अधिकृत आहेत, तर १२७ अनाधिकृत आहेत. ४० पुतळ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी मनपाची आहे, तर इतर पुतळ्यांची ते उभे करणाऱ्या नागरिकांची. सध्या कुठल्याच पुतळ्याची सुरक्षा व्यवस्था चोख नाही. विशेष म्हणजे २०११ नंतर शहरात कुठलाच पुतळा उभारण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. तरीदेखील पुतळे उभे राहत असल्याची बाब समोर आली आहे. महापालिका आणि पोलिसांनाही हे माहीत आहे, पण त्यावर कारवाई काही होत नाही.