‘संजय राऊत यांच्यावर स्वप्ना पाटकरांनी केलेले आरोप धक्कादायक,त्यांना न्याय मिळालाच पाहिजे’

sanjay raut and swapna patkar

पुणे – शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आपला छळ करत असल्याचा आरोप चित्रपट निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर यांनी सोशल मीडियावरून केला आहे. डॉ.स्वप्ना यांनी एक पत्र लिहिले आहे आणि पोस्ट करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांना टॅग करत मदतीची मागणी केली आहे. या पत्रामुळे एकच खळबळ उडाली असून संजय राऊत हे यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

स्वप्ना पाटकर यांनी आरोप केलाय की, शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’चे सह-संपादक संजय राऊत मागच्या 8 वर्षांपासून आपल्या पक्षाचे वजन वापरून त्यांना शिवीगाळ करत आहेत, तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा आणि नातेवाइकांचाही छळ करत आहेत. या बाबत थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे.

पत्रात त्यांनी लिहिले आहे की, त्यांना वेगवेगळ्या पोलीस स्थानकांत अनेक प्रकरणांत चौकशीसाठी बोलावले जाते आणि विनाकारण त्रास दिला जातो.मला मारून टाकण्याआधी न्याय मिळावा अशी अपेक्षा देखील त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिले की, ‘शिवसेना भवन’च्या तिसऱ्या मजल्यावर बोलावून त्यांच्या नातेवाइकांना मारहाण करण्यात आली आणि त्यांना माझ्याशी संबंध तोडण्यासाठी भाग पाडण्यात आले. सोबतच हे सर्व संपवण्यासाठी कोट्यावधी रुपयांच्या मागणीचा आरोपही त्यांनी केला आहे.

स्वप्ना सांगतात की, त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सना हॅक करून कधी सुसाइड नोट, तर कधी अश्लील कंटेंट टाकण्यात आला, परंतु पोलिसांनी स्पष्ट म्हटले की, संजय राऊत यांच्याविरुद्ध ते FIR नोंदवू शकत नाहीत. स्वप्ना यांनी आरोप केला आहे की, खा. संजय राऊत यांच्या इशाऱ्याने पोलिसांनी त्यांच्यावर ‘धंदा’ केल्याचा आरोपही केला होता. त्यांनी आरोप केलाय की, 2017 मध्ये स्वत: संजय राऊत यांनी फोनवर धमकी दिली आणि 2018 मध्ये भाडोत्री माणसाला त्यांचा पाठलाग करायला लावला.

दरम्यान, स्वप्ना पाटकर यांच्या आरोपानंतर आता भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांनी राऊत यांच्यावर शरसंधान केले आहे. स्वप्ना पाटकर यांनी केलेले आरोप धक्कादायक आहेत,संजय राऊत हे त्यांच्या आक्रमक विधानांसाठी प्रसिद्ध आहेत परंतु महिलांना धमकी देणे ,छळ करणे हे त्यांचे रूप कोणालाही माहीत नव्हते ते स्वप्ना पाटकर यांनी केलेल्या आरोपावरून माहीत झाले असे ‘महाराष्ट्र देशा’ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

देसाई म्हणाल्या, सत्तेच्या जोरावर महिलांचा छळ करणे आणि तिने तक्रार दाखल करु नये म्हणून तिच्यावरच खोट्या नाट्या तक्रारी दाखल करणे किंवा दाखल करण्याच्या धमक्या देणे,दादागिरी करणे,पीडीतेलाच खोटे ठरविणे सध्याच्या राजकीय नेत्यांची फॅशन झाली आहे. हे आपण धनंजय मुंडे प्रकरण ,महबूब शेख प्रकरण, पूजा चव्हाण प्रकरण आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर प्रकरणात अनुभवले सुद्धा आहे.

देसाई म्हणाल्या,संजय राऊत यांसारख्या शिवसैनिकांने महिलांबाबत असे विचार ठेवणे आणि कृती करणे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या संस्कारांचाच अपमान आहे.नीलम गोऱ्हे  आणि सुप्रिया सुळे यांना भेटूनही त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले गेले ,पाटकर यांनी या दोघींचीही भेट घेतल्यानंतर ते तातडीने राऊत यांना कळविले गेले असे जाहीरपणे स्वप्नाजी पाटकर यांनी तक्रारीत लिहिले आहे.स्वप्ना पाटकर यांनी जो न्याय मागितला आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे.स्वप्ना पाटकरजी आम्ही आपल्या बरोबर आहोत फक्त न्यायाची लढाई न डगमगता शेवटपर्यंत लढा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या