अतिरेकी घुसखोरी करून मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा शाळा सुरू होणार नाही – बाबर

भोसरी: स्वामी समर्थ विद्यामंदिरचे संस्थाचालक यशवंत बाबर यांना शिवसेना कार्यकर्ते बबन मुटके आणि अशोक खर्चे यांनी मारहाण केल्याची घटना 6 जुलै रोजी घडली होती, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोरच हा सर्व प्रकार घडला होता. दरम्यान, या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रार भोसरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. त्यानंतर आता संस्थेशी कोणताही संबंध नसणारे बबन मुटके आणि अशोक खर्चे यांनी पालकांच्या बैठकीमध्ये घुसून मारहाण केल्याने आपल्या जीवास धोका निर्माण झालं आहे, त्यामुळे जोपर्यंत शाळेत अतिरेकी प्रवेश करून मारहाण करणारे मुटके आणि खर्चे यांच्यावर कारवाई केली जाणार नाही, तोपर्यंत आपण शाळा चालवण्यास असमर्थ असल्याचं बाबर यांनी सांगितले आहे.

यशवंत बाबर हे भोसरीतील इंद्रायणी नगर येथे स्वामी समर्थ विद्यामंदिर ही शाळा चालवतात. या शाळेमध्ये अनुदानित तुकड्यासह काही विनाअनुदानित आहेत, विनाअनुदानित वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक आणि संस्थेमध्ये वाद निर्माण झाला होता. याच विषयावर तोडगा काढण्यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत पालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सामंजस्याने तोडगा निघाला, पण ही बैठक संपताच मुटके आणि खर्चे यांच्यासह काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बेकायदेशीर रित्या वर्गांमध्ये प्रवेश करत आपल्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचं यशवंत बाबर यांनी सांगितले आहे.

तर दुसरीकडे मुटके आणि खर्चे यांनीदेखील बाबर यांच्याकडून आपणास मारहाण करण्यात आल्याची तक्रार भोसरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. दरम्यान, बाबर यांना करण्यात आलेल्या मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून यामध्ये संबंधित व्यक्तींनी सर्वप्रथम मारहाण करण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे. हे सर्व होत असताना शाळेतील शिक्षकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शाळा सुरू ठेवण्यास आपण असमर्थ असल्याचं यशवंत बाबर सांगतात. त्यामुळे लवकरात लवकर संबंधित व्यक्तींवर कारवाई करून विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे.