पंकजा मुंडेंसह सुरेश धसांंना जोरदार धक्का; बीड जिल्हा परिषदेचे ‘ते’ सहा सदस्य अपात्रच

pankaja munde

औरंगाबाद: बीड जिल्हापरिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच तर एका अपक्ष जिल्हापरिषद सदस्याचे पद रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी बीड यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये दिला होता, त्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्याचे आदेश ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. मात्र मुंडे यांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्दबातल ठरवला आहे. त्यामुळे पंकजा मुंडें यांच्यासह सुरेश धस यांना जोरदार धक्का बसणार आहे.

बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना सुरेश धस समर्थक 5 जिल्हा परिषद सदस्यांनी मदत केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचं संख्याबळ असतानाही भाजपचा अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आला.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांनी पक्ष आदेश धुडकावत भाजपला मतदान केले होते. तर एक सदस्य मतदानावेळी गैरहजर राहिला होता. या सर्व प्रकरणावर बीड जिल्हाधिकारी यांचेकडे अपील दाखल करण्यात आले . यावर जिल्हाधिकारी बीड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच तर एका अपक्ष जिल्हापरिषद सदस्याचे पद रद्द केले .

दरम्यान, या सहा सदस्यांचे पद रद्द करण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाला पंकजा मुंडे यांनी स्थगिती दिली होती. मात्र आता औरंगाबाद खंडपीठाने मुंडे यांचा निर्णय रद्दबातल ठरवल्याने भाजपला जोरदार धक्का बसला आहे, तर सहाही जिल्हा परिषद सदस्य विधानपरिषद निवडणुकीत मतदान करू शकणार नाहीत.