सस्पेन्स कायम! आसामच्या मुख्यमंत्रिपदी सोनोवाल की बिश्व सरमा?

गुवाहाटी : आसाम राज्य विधानसभा निवडणुकीत भाजप युतीने बहुमताने दुसऱ्यांदा सत्ता हस्तगत केली आहे. मुख्यमंत्रीपदी सर्वानंद सोनोवाल यांची पुन्हा वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. याचवेळी हेमंत बिश्व सरमा यांच्या रूपाने मुख्यमंत्रीपदासाठी नव्या चेहऱ्याला संधी मिळणार असल्याचा कयास लावला जात आहे.

यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी प्रचंड कष्ट घेतले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनाच पहिली पसंती मिळणार असल्याचे बोलले जात आहे; परंतु याशिवाय विद्यमान मंत्री हेमंत बिश्व सरमा हासुद्धा भाजपचा एक ताकदवान चेहरा मानला आहे. काँग्रेसमध्ये असताना त्यांना मुख्यमंत्री बनविले नव्हते. त्यामुळेच त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता आसामच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे.

आसाममध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले हिमंत बिस्व सरमा यांच्याभोवती राजकारण फिरतं आहे. मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याशी बेबनाव आणि काँग्रेस हायकमांडकडून महत्त्व न मिळणं यामुळे हिंमत यांनी काँग्रेसला रामराम केला होता.