‘सत्ताधारी असो वा विरोधक, संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदाराचे दोन वर्षांसाठी निलंबन करा’

‘सत्ताधारी असो वा विरोधक, संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदाराचे दोन वर्षांसाठी निलंबन करा’

ramdas athawale

नवी दिल्ली : १९ जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. दरम्यान, कोरोना महामारीचे संकट रोखण्यात आलेले अपयश, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, शेतकरीविरोधी कायदे या मुद्दय़ांवर विरोधक हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. यामुळे मोदी सरकारसमोर हे अधिवेशन विना अडथळा पार पाडण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

अशातच पेगासास प्रकरण समोर आल्याने विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला असून राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागत आहे. मोदी सरकारविरोधात सर्वच विरोधी पक्ष एकवटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना चर्चेसाठी देखील निमंत्रित केल्यानंतर चर्चा न करता विरोधकांनी आपला गोंधळ हा कायम ठेवला आहे.

अधिवेशनात जनतेच्या हिताच्या निर्णयावर चर्चा होत नसल्याने भाजपने विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे. दरम्यान, जे खासदार गोंधळाची परिसीमा पार करतील त्यांचे दोन वर्षांचे निलंबन करावे अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. सत्ताधारी पक्षाचा समर्थक सदस्य असो वा विरोधक दोघांबाबत हा निर्णय लावण्यात यावा असं देखील रामदास आठवले म्हणाले आहेत.

‘संसदेत जे खासदार सलग तीन दिवस गोंधळ घालून चौथ्या दिवशीही संसदेत गोंधळ घालून कामकाज रोखण्याचा प्रयत्न करतील त्यांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्याचा नियम करण्यात यावा. सरकार पक्षाचा खासदार असो अथवा विरोधी पक्षाचा खासदार असो सर्व खासदारांना हा नियम लागू करावा. संसदेचे कामकाज रोखणे अक्षम्य गुन्हा आहे. संसदेचा बहुमूल्य वेळ वाया घालवून देशाचा पैसा वाया जातो. संसदेचे कामकाज रोखल्यामुळे देशाचे नुकसान होते.त्यामुळे सलग 4 दिवसांपेक्षा जास्त काळ गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखणाऱ्या खासदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्याचा कायदा करावा,’ असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या