‘भारतव्याप्त काश्मिर’ अशी कोणतीही जागा नाही – सुषमा स्वराज

नवी दिल्ली – परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या ट्विटरवर नेहमीच सक्रिय असतात आणि लोकांची मदत करतात. मात्र आज सुषमा स्वराज यांच्याकडे ट्विटरवरून मदत मागणाऱ्या एका विद्यार्थ्याला सुषमा स्वराज यांनी दिलेल्या हटके उत्तरामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

ट्विटरवर शेख अतीक नावाच्या एका युजरने सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली. ट्विटमध्ये त्याने , ‘सुषमा जी मला तुमच्या मदतीची गरज आहे…मला भारतात माझ्या घरी परतायचंय, पण माझा पासपोर्ट खराब झालाय, मी विद्यार्थी असल्याने जास्त खर्च करु शकत नाही तसंच माझी प्रकृतीही ठिक नाहीये. तुम्ही काही करु शकतात का ?’असं म्हटलं.त्याच्या ट्विटला उत्तर देताना सुषमा यांनी ट्विट केलं, ‘जर तुम्ही जम्मू-काश्मीरचे असतात तर मी नक्कीच तुमची मदत केली असती. मात्र तुमच्या प्रोफाईलनुसार तुम्ही भारतव्याप्त काश्मीरमध्ये राहतात, पण अशी कोणती जागाच नाहीये’.

स्वराज यांच्याकडून आलेल्या या उत्तरानंतर मदत मागणाऱ्या विद्यार्थ्याने तातडीने स्वतःची प्रोफाईल बदलली आणि भारतव्याप्त काश्मिरऐवजी जम्मू-काश्मिर असं केलं. त्यानंतर त्याने पुन्हा ट्विट करुन, मी जम्मू-काश्मिरचा असून फिलिपाइन्समध्ये शिक्षणासाठी आलो आहे असं म्हटलं.